जळगाव : कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्यानंतर त्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी शासनाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. परतू शहरातील साधना हाॅस्पिटलच्या चालकांनी एका व्यक्तिचा मृतदेह केवळ चादरीत गुंडाळून नातलगांच्या हवाली करण्याचा धोकादायक प्रकार शुक्रवारी सकाळी घडला.
पाचोरा येथील एका ४० वर्षीय कोरोना बाधित व्यक्तीला श्वास घ्यायला त्रास होत असल्याने चार दिवसांपूर्वी पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात असलेले साधना हॉस्पिटल अँड श्रद्धा क्रिटिकल केअर सेंटर हे रुग्णालयमध्ये दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. सकाळी नऊ वाजता रुग्णवाहिका आल्यावर त्यांचा मृतदेह नातलगांनी मागितला तेव्हा एका चादरीत गुंडाळून तो नातलगांच्या ताब्यात देण्यात आला. त्यावेळी मृतदेहाचा चेहरा व्यवस्थित बंदही केलेला नव्हता.
सोबत कोणीही दिले नाही. मात्र, पर्याय नसल्याने नातलगांनीच तो नेरी नाका स्मशानभूमीत नेऊन त्यावर अंत्यसंस्कार केले. या आधीही गुरुवारी भुसावळच्या एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर रुग्णालयाने असाच चादरीत गुंडाळून मृतदेह दिला, असे तिथे असलेल्या रुग्णांच्या नातलगांनी सांगितले. त्यामुळे या रुग्णालयाकडून असा बेजबाबदारपणा कधीपासून सुरू आहे, याची चौकशी होण्याची आवश्यकता आहे.