धक्कादायक : उस्मानाबादमध्ये मतदान करताना केलं फेसबुक लाइव्ह

0

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातील देशातील ९५ जागांसाठी आज मतदान होत असून अनेक धक्कादायक प्रकार घडत आहे. आज अकोल्यात एका मतदाराने मतदायंत्रच फोडले आहे तर दुसरीकडे मतदान करण्यासाठी गेलेल्या एका तरुणाने चक्क फेसबूक लाइव्ह केल्याचा खळबळजनक प्रकार उस्मानाबादमध्ये घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार तरुणांविरोधात सायबर क्राइम अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरू आहे.

काही अतिउत्साही मतदारांनी मतदान केंद्रामध्ये मोबाईल नेण्यास व चित्रिकरण करण्यावर बंदी असतानाही मतदान करतानाचा फोटो, व्हिडिओ काढून उमेदवारांना पाठविला आहे. या प्रकारामुळे गुप्त मतदान करण्याच्या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. मतदानाची गोपनीयता पाळली जावी म्हणून मतदानयंत्र एका बंद खोलीत ठेवलं जातं. पण असं असतानातही राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या एका कार्यकर्त्याने मतदान करताना फेसबूक लाइव्ह केलं आहे. प्रणव पाटील असे या तरुणाचे नाव असून त्याला पोलिसांनी फेसबुक लाइव्ह डिलीट करण्यास भाग पाडले. या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर परभणी मतदारसंघात मतदारांनी कोणाला मतदान केले याचे पुरावेच त्या त्या पक्षांच्या उमेदवारांना पाठविल्याने निवडणूक कर्मचारीही हैराण झाले आहेत. हे फोटो फेसबुकवर टाकताना ‘दादा तुमचा विजय निश्चित’, ‘दादा तुम्हीच’ असे उल्लेख केले आहेत. तर उस्मानाबादच्या या तरुणाने ‘माझं मत सिंहाच्या छाव्याला’ म्हणत फेसबूक लाईव्ह केले होते. मात्र, अडचणीत येतो असे समजल्यावर त्याने हा लाईव्ह व्हिडिओ डिलिट केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.