हैद्राबाद :- आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील ७.८ कोटी लोकांचा आधार डेटा चोरला गेला असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. हा डेटा टीडीपी पक्षाचं सेवा मित्र अॅप डेव्हलप करण्यासाठी वापरत असल्यामुळे हैदराबादमधील सायबराबाद पोलिसांनी युआयडीएआयने दिलेल्या तक्रारीनंतर माहिती तंत्रज्ञान कंपनी आयटी ग्रिड्स (इंडिया) विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या प्रकरणातील पुढील तपास सुरू आहे.
आंध्र प्रदेशात आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तेलुगू देशम पक्षाने ‘सेवामित्र’ हे नवीन अॅप लॉंच केलं आहे. या अॅपचा करार ज्या कंपनीला दिला त्या कंपनीच्या आयटी सेलने ७ कोटी८० लाखांहून अधिक लोकांचा डेटा चोरला असल्याची माहिती मिळते आहे. स्टेट डेटा डिपॉझिटरीतून हा डेटा चोरण्यात आला आहे. संबंधित आयटी सेलच्या हार्ड डिस्क तपासल्यानंतर संबंधित अॅपच्या रिमुव्हेबल स्टोरेजमध्ये हा डेटा ठेवला असल्याचं स्पष्ट झालं. या डेटाचे स्वरूप युआयएडीए सारखेच असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झालं आहे. आधार कायदा २०१६ अंतर्गत याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.