नवी मुंबई : नवी मुंबईतील भाजपाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी चक्क मतदारांना लोकसभेत दोन वेळा मतदान करण्याचे आवाहन केले आहे. कोपरखैरणे येथे ठाण्यातील लोकसभा मतदार संघातील उमेदवार राजन विचारे आणि सातारा लोकसभा उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ युतीच्या माध्यमातून कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंदा म्हात्रे यांनी हे वादग्रस्त विधान केले. राष्ट्रवादी काँग्रेसने हे वक्तव्य आक्षेपार्ह असल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. करत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. दरम्यान आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही उमेदवार शिवसेनेचे असून पश्चिम महाराष्ट्रातील मोठी मतदार संख्या नवी मुंबईत वास्तव्यास आहे. विशेषता माथाडी वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने भाजपाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी त्यांना सातारा येथे जावून शिवसेना उमेदवार नरेंद्र पाटील यांना २३ एप्रिल रोजी मतदान करण्याचे सांगितले. तर परत २९ एप्रिल रोजी ठाणे लोकसभेचे मतदान असल्याने परत येवून शिवसेना उमेदवार राजन विचारे यांना मतदान करण्याचे आवाहन केले. मंदा म्हात्रे यांना आपली चूक लक्षात येताच राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील असाच सल्ला यापूर्वी दिला होता असं सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी आता विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे मंदा म्हात्रे यांच्या वक्तव्याची तक्रार केली आहे.