भोपाळ :- मध्य प्रदेशातील चित्रकूट येथून अपहरण करण्यात आलेल्या ५ वर्षांच्या दोन जुळ्या भावांची निर्घृण हत्या करण्यात आली असल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेची बातमी मिळताच मध्यप्रदेश हादरले असून यावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. देवांश आणि प्रियांश अशी या जुळ्या भावांची नावे आहेत. चिमुरड्यांचा मृतदेह सापडला तेव्हा सकाळी घरातून निघताना घातलेल्या शाळेचा गणवेश अद्यापही त्यांच्या अंगावर होता. आरोपींनी दोघा जुळ्या भावंडांना यमुना नदीत फेकून दिले होते. या हत्येने मृत्यच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून २० लाखांची खंडणी घेऊनही आरोपींनी त्यांची हत्या केली.
उत्तर प्रदेशातील चित्रकूट धाम येथील तेलाचे व्यापारी बृजेश रावत यांच्या पाच वर्षांच्या जुळ्या मुलांचे १२ जानेवारी रोजी अपहरण झाले होते. दुचाकीस्वारांनी मध्य प्रदेशातील सदगुरु सेवा ट्रस्टच्या शाळेतून हे अपहरण केले होते. पोलिसांनी आरोपींकडून खंडणीचे १७.६७ लाख रुपये, दुचाकी आणि कार जप्त केली आहे.
गुन्ह्यात सहभागी सहा अपहरणकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. पद्म शुक्ला, लकी सिंह तोमर, रोहित द्विवेदी, रामकेश यादव, पिंटू उर्फ पिंटा यादव अशी या आरोपींची नावे आहेत. रामकेश यादव दोन्ही मुलांची शिकवणी घेत असे. पद्म आणि लकी हे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत.अपहरणकर्त्यांच्या गाडीवर भाजपाचा झेंडा असल्याने यावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.