दोन गावठी पिस्तुल घेवून दहशत माजविणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या
अमळनेरात एलसीबीच्या पथकाची कारवाई

अमळनेर I लोकशाही न्यूज नेटवर्क
दोन गावठी पिस्तुल घेऊन शहरात दहशत माजवण्याच्या उद्देशाने बाळगणाऱ्या गांधलीपुरा भागातील अनिल मोहन चंडाले याला एलसीबी आणि स्थानिक पोलिसांनी घेराव घालून अटक केली. ही कारवाई दि २५ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ग्रामीण रुग्णालयाजवळ इंदिरा भुवन जवळ घडली.
एलसीबीचे हेडकॉन्स्टेबल विष्णू बिऱ्हाडे, दीपक माळी, रवींद्र पाटील हे अमळनेर शहरात रेकॉर्ड वरील गुन्हेगार तपासत होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक सोपान मोरे यांना मिळालेल्या माहितीनुसार यावल येथील युवराज उर्फ युवा राजू भास्कर यांच्याकडे एक गावठी पिस्तुल आणि दोन काडतुस सापडले आहे. चौकशीत त्यांनी सांगितले की भूषण कैलास सपकाळे रा. भुसावळ आणि समाधान बळीराम निकम रा. पाचोरा यांनी तीन
पिस्तुल व सहा काडतुसे उमर्टी येथून आणले होते. भूषणने ते युवराज भास्कर याला विकले आणि त्याने दोन पिस्तुल व चार काडतुसे अमळनेर येथील अनिल मोहन चंडाले याला विकले असल्याचे सांगितले.
अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना कळवले. त्यांनी एलसीबी पोलिसांसह पोलीस निरीक्षक शरद काकळीज, संतोष नागरे, नितीन मनोरे यांना अनिल चंडाले याला पकडण्यासाठी पाठवले. ग्रामीण रुग्णालयाजवळ इंदिरा भुवन जवळ अंधारात तो उभा असताना त्याला सापळा रचून अटक केली. त्याच्याजवळून दोन गावठी पिस्तुल आणि चार काडतुस असा ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


