नवी दिल्ली : देशामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. देशात गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 13,586 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 3,80,532 वर पोहोचली आहे. तर 12,573 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.
शुक्रवारी (19 जून) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 13,586 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 380532 वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा बारा हजारांवर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 163248 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 2,04, 711 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अमेरिका, इटलीसारखे देश कोरोनापुढे हतबल झाले आहे.

जगाच्या तुलनेत भारतातील मृत्यूंचे प्रमाण अतिशय कमी असून, मृत्यूदरात भारत जगामध्ये आठव्या स्थानी आहे. कोरोनाच्या एकूण बळींपैकी 70 टक्के रुग्णांना अन्य काही ना काही आजार होते, असे आढळून आले आहे. त्यामुळे अन्य काही आजार असणाºयांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे, असे आरोग्य मंत्रालयाने पुन्हा एकवार स्पष्ट केले आहे. देशातील एकूण रुग्णांपैकी 1 लाख 16 हजार रुग्ण एकट्या महाराष्ट्रातील आहेत. देशाच्या प्रत्येक राज्यात कोरोनाचे रुग्ण आहे.


