नवी दिल्ली : देशात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत भारतानं आज आणखी एक नवा रेकॉर्ड तयार केलाय. आरोग्य मंत्रालयानं शनिवारी सकाळी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारच्या २४ तासांत २ लाख ३४ हजार ६९२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याच २४ तासांत १ लाख २३ हजार ३५४ जणांनी करोनावर मात केली तर १ हजार ३४१ करोनाबाधित रुग्णांनी आपले प्राण गमावले.
देशात एव्हाना ११ कोटी ९९ लाख ३७ हजार ६४१ करोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. करोना संक्रमणाचा हाच वेग कायम राहिला तर दररोजी रुग्णसंख्या लवकरच अडीच लाखांवर पोहचण्याची भीती निर्माण झालीय.
याचसोबत, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १ कोटी ४५ लाख २६ हजार ६०९ वर पोहचलीय तर आतापर्यंत देशात एकूण १ लाख ७५ हजार ६४९ नागरिकांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. सध्या देशात १६ लाख ७९ हजार ७४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं (ICMR)दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत एकूण २६ कोटी ४९ लाख ७२ हजार ०२२ नमुन्यांची तपासणी करण्यात आलीय. यातील १४ लाख ९५ हजार ३९७ नमुन्यांची करोना चाचणी केवळ शुक्रवारी करण्यात आली.