नवी दिल्ली : देशात कोरोनाचा कहर सुरूच आहे. आज सलग चौथ्या दिवशी 24 तासांत 35 हजारहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. 24 तासांत 37 हजार 724 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर, 648 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 11 लाख 92 हजार 915 गेली आहे.
दिलासादायक बाब म्हणजे आज एकाच दिवसात तब्बल 27 हजार 589 रुग्ण निरोगी झाले. एकाच दिवसात सर्वात जास्त निरोगी रुग्णांचा रेकॉर्ड ब्रेक आकडा आहे.यासह भारताचा रुग्ण बरे होण्याचा दर 63.12% झाला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार. देशात सध्या 4 लाख 11 हजार 133 सक्रीय रुग्ण आहेत. तर, 28 हजार 732 रुग्णांचा मृत्य़ू झाला आहे. तर आतापर्यंत एकूण 7 लाख 53 हजार 49 रुग्ण निरोगी झाले आहेत. भारताचा सकारात्मकता दर 10.99% आहे. जगातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत अमेरिका, ब्राझीनंतर तिसरा क्रमांक भारताचा आहे.

