एम्सच्या डॉक्टरांचा दावा
नवी दिल्ली – मागील आठ ते नऊ महिन्यांपासून भारतासह संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसने कहर केला आहे. त्यातच आता संपूर्ण जगभरातील लोकांचे कोरोना व्हायरसची लस कधी तयार होणार याकडे लक्ष आहे. संपूर्ण जगभरातील वैज्ञानिक आणि डॉक्टर कोरोना व्हायरसपासून बचावासाठी प्रयत्न करत आहेत. अशा स्थितीत कोरोनाच्या संक्रमणाबाबत तसेच लसीकरणाबाबत एक सकारात्मक माहिती समोर येत आहे. एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी कोरोनाबाधित रुग्णांची घटती संख्या पाहून देशात कोरोनाची लस येण्याआधीच भारतीयांना कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी लागणारी इम्युनिटी तयार होईल, असा दावा केला आहे.
भारतातील इतर राज्यात दिल्लीप्रमाणेच वाढत जाणारे प्रदूषण, दिवाळीची एकूण परिस्थिती पाहता कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर पुन्हा एकदा कोरोनाग्रस्तांचा आकडा थंडीमुळे वेगाने वाढू शकतो, असे काही तज्ज्ञांचे म्हणणे असतानाच एम्सच्या डॉक्टरांनी केलेला दावा हा दिलासादायक ठरत आहे.
एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी कोरोनाबाबत माहिती देताना सांगितले की, ज्या प्रकारचा ट्रेंड आपण पाहत आहोत. ते पाहिल्यानंतर आपण असे म्हणू शकतो की देशात कोरोनाची लस येण्याआधी भारतीयांची प्रतिकारशक्ती विकसित होऊ शकते. कदाचित कोरोनाचे स्वरुप बदलणार नाही.
पुढे त्यांनी सांगितले की, आपण येत्या काळात अशा टप्प्यावर पोहोचू शकतो, जेथे देशातील नागरिकांमध्ये रोग प्रतिकारशक्ती एवढी वाढू शकते की लसीची त्यांना गरज देखील भासेल की नाही याबाबत शंका आहे.
कोरोनाग्रस्तांच्या संख्येत होणारी घट ही दिलासादायक बाब आहे. पण येत्या काळात थंडीचा कडाका वाढला आणि प्रदूषण जास्त असेल तर कोरोनाचे विषाणू हवेत अधिक काळ जिवंत राहू शकतात आणि वेगाने पसरण्याचा धोका देखील आहे. कोरोना अद्याप संपलेला नाही याचे भान नागरिकांनी ठेवायला हवे . सोशल डिस्टेंसिंग, मास्कचा वापर आणि सॅनिटायझर या गोष्टींचा वापर केला पाहिजे, असे मत यावेळी डॉ. गुलेरिया यांनी व्यक्त केले.