नवी दिल्ली ː लोकशाही न्यूज नेटवर्क
1980 सालापासून 2010 पर्यंतच्या 30 वर्षांच्या कालावधीत 246.48 अब्ज डॉलर (17,25,300 कोटी रुपये) ते 490 अब्ज डॉलर (34,30,000 कोटी रुपये) एवढा काळा पैसा भारतीयांकडून परदेशात पाठवण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एनआयपीएफपी, एनसीएईआर आणि एनआयएफएम या तीन बड्या संस्थांनी संशोधन करून प्रसिद्ध केलेल्या अहवालात सदर माहिती देण्यात आली आहे.
बांधकाम, खाण, औषधे, पान मसाला, गुटखा, तंबाखू, व्यापारी माल, सोने-चांदी, चित्रपट आणि शिक्षण अशा क्षेत्रात सर्वाधिक काळा पैसा असल्याचा निष्कर्ष या तीन संस्थानी केलेल्या सर्व्हेक्षणातून समोर आला आहे, अशी माहिती आर्थिक व्यवहारांच्या स्थायी समितीने सोमवारी लोकसभेत दिली. काळा पैशाच्या साठवणुकीवर किंवा त्याच्या एकत्रिकरणाचा कोणताही अंदाज बांधू शकत नाही. त्याचप्रमाणे एखाद्या तर्कावरून काळ्या पैशाबाबतची ठोस कार्यपद्धती सांगितली जाऊ शकत नाही. यासंदर्भात मांडण्यात आलेल्या गोष्टी मूलभूत ठोकताळे आणि त्यातील छोट्या छोट्या गोष्टींवर अवलंबून आहेत, असे देशातील आणि देशाबाहेरील काळ्या पैशाची सद्यस्थिती आणि त्याचे विश्लेषण नामक अहवालात मांडण्यात आले आहे. या अहवालात मांडण्यात आलेले अंदाज कोणत्याही एका प्रकारच्या तपास पद्धतीने समोर आलेले नाहीत. त्याचप्रमाणे यातील तपास पद्धती आणि दृष्टिकोन याविषयी एकमतही नाही, असेही यात म्हटले आहे. नॅशनल काऊंसिल ऑफ अप्लाइड इकनॉमिक रिसर्च (एनसीएईआर) यांच्या अहवालानुसार 1980 ते 2010 या तीस वर्षांमध्ये भारतीयांनी परदेशात सुमारे 26,88,000 लाख कोटींपासून ते 34,30,000 कोटी रुपये पाठवले. तर, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फाइनॅन्शल मॅनेजमेंट (एनआयएफएम) या संस्थेच्या सर्व्हेक्षणानुसार, 1990 ते 2008 या कालावधीत 15,15,300 कोटी रुपये भारतीयांनी परदेशात पाठवले. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक पॉलिसी अॅण्ड फाइनान्स (एनआयपीएफपी) या संस्थेच्या मते, 1997-2009 या कालावधीत देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपी) 0.2 ते 7.4 टक्के काळा पैसा भारतीयांकडून परदेशात पाठवण्यात आला. काळ्या पैशावरून राजकारण तापल्याच्या पार्श्वभूमीवर मार्च 2011 मध्ये तत्कालीन सरकारने या तीन संस्थांना देश आणि देशाबाहेरील भारतीयांच्या काळ्या पैशाचा शोध घेण्याचे काम सोपवले होते. दरम्यान 2014 मध्ये आलेल्या मोदी सरकारने विदेशातील भारतीयांचा काळा पैसे देशात आणण्याचे आश्वासन दिले होते. मात्र भाजप सरकार मध्ये येऊन 5 वर्षाची टर्म पूर्ण होऊनही अद्याप काळा पैसा भारतात आलेला नाही. 2014 च्या निवडणुकीत भाजपने काळा पैशाचा मुद्दा लावून धरला होता, भारतातील जनतेलाही मोदींकडून या आश्वासनाची पूर्तता होईल असा विश्वास आहे. चालू पंचवार्षिकमध्ये मोदी सरकार काळा पैसा भारतात आणेल काय हे येणारा काळच सांगू शकेल.