देशभरात आजपासून अटींसह दुकाने उघडण्यास परवानगी

0

नवी दिल्ली : करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आले  आहे. यामुळे देशभरात दुकानं, मॉल्स बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु शुक्रवारी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्रालयाने मोठा निर्णय घेतला. काही अटींसह सरकारने आता दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता दुकानदारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दुकानांना जरी परवानगी देण्यात आली असली तरी मॉल्स मात्र बंद ठेवण्यात येणार आहेत.

गृहमंत्रालयाने शुक्रवारी रात्री काढलेल्या पत्रकानुसार देशातील सर्व दुकाने काही अटींवर उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. आजपासून हा आदेश लागू होणार आहे. महानगरपालिका आणि नगरपालिका हद्दीतील निवासी भाग आणि परिसरातील दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

दरम्यान करोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असलेल्या तसेच हॉटस्पॉट असेलेल्या ठिकाणांमध्ये मात्र दुकाने उघडी ठेवता येणार नाहीत. याव्यतिरिक्त मद्य विक्रीची दुकाने तसेच मॉल्स सुरू करण्याला अद्याप परवानगी देण्यात आली नाही.

राज्य सरकार मात्र आपल्या अधिकारानुसार दुकाने सुरू ठेवायची अथवा नाही यावर निर्णय घेऊ शकतात. तसेच सामान्य दुकानांना ५० टक्के कामगारांसह काम करण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच काम करणाऱ्यांना मास्क घालणे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त पालिका आणि नगरपालिकांच्या बाजारपेठांमधील दुकाने मात्र ३ मे पर्यंत उघडता येणार नाहीत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.