तिरुपती :- पावसाने दडी मारल्यामुळे देवळांची नगरी म्हणून ओळख असलेल्या तिरुपतीमध्ये आजवरचा सर्वात मोठा दुष्काळ पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कल्याणी धरणात केवळ मृत पाणीसाठा शिल्लक असून कैलासगिरी नदीतही जेमतेम महिनाभर पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे तिरुपतीमधील लोकांना पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे.
तिरुपतीचे पालिका आयुक्त पी.एस. गिरीश यांनीही या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. तिरुपतीमध्ये सध्या पाण्याची गंभीर परिस्थिती आहे. नदी आणि धरणाच्या मृतसाठ्यातून शहराला कसाबसा महिन्यापेक्षाही कमी दिवस पाणीपुरवठा होऊ शकतो. या दरम्यान पाऊस न पडल्यास परिस्थिती आणखी बिकट होईल, तिरुपती महापालिका पिण्याच्या पाण्यासाठी केवळ कल्याणी धरण आणि कैलासगिरी नदीवरच अवलंबून आहे. त्यातून दररोज 45 दशलक्ष लिटर पाणी पिण्यासाठी घेतले जाते. परंतु कल्याणीने कधीच मृतसाठा गाठला आहे. त्यामुळे सध्या कैलासगिरी नदीवरच पालिकेची भिस्त आहे. या नदीतून रोज 45 दशलक्ष लिटर पाणी घेतलं जातं, पण 29 दिवसानंतर ही नदीही मृत पाणीसाठ्याची पातळी गाठेल, असं गिरीश यांनी सांगितले.