पवारांनी दुष्काळ दौऱ्यानंतर लोकांकडून आलेल्या मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या
मुंबई :- राज्यात भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी इतर नेत्यांसह बुधवारच्या रात्री मुख्यमंत्री फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी सुमारे तासभर दुष्काळाबाबतच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. शरद पवार यांनी आपल्या दुष्काळ दौऱ्यानंतर लोकांकडून आलेल्या मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या.
या बैठकीदरम्यान शरद पवारांनी फळबाग, चारा छावण्या, दुष्काळी भागातील नागरिकांच्या हाताला काम, योग्य पाणी नियोजन, दुष्काळ भागात अन्नधान्य नियोजन, जायकवाडी धरण पाणी या प्रमुख विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच मुख्यमंत्र्यापुढे मागण्या केल्या की, आमच्या सरकारच्या काळात आम्ही प्रति-हेक्टर 35 हजार दिले होते ते द्यावेत. 2011 च्या जनगणनेनुसार पाणी दिले जाते त्यात बदल करावा. दुष्काळग्रस्त भागात पाणी वाटपात घोटाळा होतो ते रोखावे. छावण्या सुरू झाल्या पण ज्या संस्था छावण्या चालवतात त्यांना पैसे दिले गेले नाही.
तत्पूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले होते. महाराष्ट्रातील बहुतांश भागात १९७२ च्या दुष्काळापेक्षाही भीषण स्थिती आहे. शरद पवारांनी ३० एप्रिल, १२ व १३ मे या दिवशी सोलापूर, अहमदनगर व बीड जिल्ह्यांतील दुष्काळग्रस्त गावांना, पाण्याअभावी सुकलेल्या फळबागांना व चारा छावण्यांना भेटी देऊन शेतकरी व ग्रामस्थांशी चर्चा केली होती.