पाचोरा ;- इलेक्ट्रीक दुकान टाकण्यासाठी ५ लाख रुपये व नविन घर घेण्यासाठी १० लाख रुपये माहेरहून आणावे या मागणीसाठी धुपे ता. चोपडा येथील माहेरवाशिणीचा पाचोरा येथील पांडव नगरी येथे पतीसह सासरच्या मंडळींकडून शारिरीक व मानसिक छळ सुरु होता. सततच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर विवाहितेच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, धुपे ता. चोपडा येथील जयश्री हिचा विवाह पाचोरा येथील घनश्याम हरी पगारे रा. पांडव नगरी, पाचोरा यांचेशी ७ मार्च २०११ रोजी पाचोरा येथील जगदंबा माता मंदिर, पाचोरा येथे झाला होता. लग्नानंतर ६ महिन्यांनी घनश्याम पगारे यांना दारुचे व्यसन लागले. तद्नंतर जयश्री हिचा सासरच्या मंडळींकडून किरकोळ कारणावरून वाद निर्माण होवु लागले. तसेच जयश्री हिच्या चारित्र्यावर संशय घेत शिवीगाळ करत पती घनश्याम पगारे यांचेकडुन मारहाण होत होती. यासोबतच माहेरहून इलेक्ट्रीक दुकान टाकण्यासाठी ५ लाख रुपये व नविन घर घेण्यासाठी १० लाख रुपये आणण्याचा तगादा सुरु झाला. सततच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर जयश्री हिच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये घनश्याम हरी पगारे (पती), उषा हरी पगारे (सासु), संजय हरी पगारे (जेठ), ज्योती संजय पगारे (जेठाणी) रा. पांडव नगरी, पाचोरा, रविंद्र विश्राम पाटील (मामसासरे) व अरुणाबाई रविंद्र पाटील (मामसासु) रा. गिरड ता. भडगाव यांचे विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असुन या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस काॅन्स्टेबल नरेंद्र नरवाडे हे करीत आहे.