दिव्यांग बांधवांच्या न्याय हक्कासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

दिव्यांग बांधव त्यांच्या न्याय हक्कासाठी दि. ५/१/२०२२ बुधवार पासून  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करीत आहे.  महाराष्ट्र शासनाकडून जळगाव जिल्ह्यासाठी स्वस्त धान्य दुकानातून धान्य वाटप होत असते. दिव्यांग बांधवांसाठी महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभागाकडून दिनांक १ जानेवारी २०२१ पासून अध्यादेश काढण्यात आलेला असून सदरील अध्यादेशानुसार घरातील कुठल्याही दिव्यांग व्यक्तीचे शिधापत्रिकेत नाव असल्यास संबंधिताचे संपूर्ण कुटुंबाला ३५ किलो धान्य वाटप करण्यात यावे. असे असतांना शहरातील व जिल्ह्यातील अनेक स्वस्त धान्य दुकानादाराकडून सदरील अध्यादेशाची उघडपणे पायमल्ली होत असून दिव्यांगांना त्यांच्या हक्काचे धान्यापासून वंचित ठेवीत आहेत.

याबाबत संबंधित दुकानादाराशी विचारपूस केली असता ते सांगतात आम्हाला याबाबत माहितीच नाही, तसेच तुमचा फोटा आलेला नाही, सद्यस्थितीत तो शिल्लक नाही अशी उडवाउडवीच उत्तरे देऊन आम्हां दिव्यांग बांधवांची एक प्रकारे हेटाळणी करुन आमच्यावर उघडपणे अन्यायच होत आहे.

याबाबत दिव्यांग सेनेने जागतिक अपंग दिनी म्हणजे दि. ३/१२/२०२१ रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन दिव्यांग बांधवांसाठी त्यांना त्यांचे हक्काचे शासनाकडून आलेल्या आदेशानुसार प्रत्येक दिव्यांग बांधवास ३५ किलो धान्य मिळण्याबाबतचे योग्य त्या सूचना जिल्हा / तालुका पुरवठा शाखेचे अधिकारी वर्ग, सर्व शहरातील व जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांदाराना देण्यात याव्यात, तसेच त्यांना शासनाच्या अंत्योदय योजनेचे कार्ड मिळण्यात यावेत याबाबत देखील संबंधितांना सूचना व्हाव्यात असे कळविले होते.

परंतु आमच्या मागण्याचा काहीएक विचार झाला नाही. त्यानंतर पुन्हा  जिल्हाधिकारी यांना  दि. २९/१२/२०२१ रोजी स्मरणपत्र देऊन आम्हाला न्याय न मिळाल्यास दि. ०५/०१/२०२२ रोजी उपोषणाचा मार्ग अवलंबविणार असल्याचे कळविले होते. परंतु त्यावर सुध्दा जिल्हाधिकारी यांचेकडून काहीएक उत्तर मिळाले नाही.

त्यामुळे शेवटी आमचा आता नाईलाज झालेला असल्याने आम्ही आमचे न्याय हक्कासाठी बुधवार, दिनांक ५/१/२०२२ पासून आमचे संघटनेचे पदाधिकारी  भरत रामा जाधव, महाराष्ट्र राज्य सचिव; अक्षय महाजन, जिल्हाध्यक्ष जळगाव; शे. शकील जिल्हा उपाध्यक्ष,  हितेश तायडे, जळगाव जिल्हा सचिव; भिमराव म्हस्के मुकबधिर जिल्हाध्यक्ष; तोशीफ शहा, शहर सचिव; मुत्ताजीम खान, अल्पसंख्यांक अपंग जिल्हाध्यक्ष; सादीक पिंजारी; नितीन सुर्यवंशी, ज्ञानेश्वर पाटील इ. बांधव उपोषणास बसलेले असून त्याद्वारे दिव्यांग बांधवांचे न्याय ते मिळविणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.