नवी दिल्ली: दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश एस. मुरलीधर यांची पंजाब आणि हरयाणा हायकोर्टात बदली करण्यात आली आहे. सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या सल्ल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश एस. मुरलीधर यांची पंजाब आणि हरयाणा हायकोर्टात बदली केली आहे. राष्ट्रपतींनी न्यायाधीश मुरलीधरन यांना पंजाब आणि हरयाणा हायकोर्टात न्यायाधीश म्हणून काम पाहावे असे आदेश दिल्याचे त्या बाबतच्या अधिसूचनेत म्हटले आहे.
दिल्लीतील हिंसाचाराबाबत सामाजिक कार्यकर्ते हर्ष मंदर यांनी केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी झाली. ही सुनावणी संध्याकाळच्या सुमारास संपली त्यानंतर रात्री साडे अकरा पावणेबाराच्या सुमारास न्या. मुरलीधर यांच्या बदलीचे आदेश आले. न्या. मुरलीधर यांनी सुनावणीदरम्यान केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या दिल्ली पोलिसांना चांगलेच फैलावर घेतलं होतं. मात्र आता बदली झाल्यामुळे न्या. मुरलीधर दिल्ली हिसांचार प्रकरणाची पुढील सुनावणी करणार नसल्याचे समजते.
न्यायाधीश एस. मुरलीधर यांची २९ मे २००६ ला दिल्ली हायकोर्टाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झाली होती. इथल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांनी आयपीसी कलम ३७७ ला देखील नॉन क्रिमिनल घोषित केले होते. ज्येष्ठतेनुसार न्यायाधीश मुरलीधर हे दिल्ली हायकोर्टातील न्यायाधीशांमध्ये तिसऱ्या स्थानी होते. आता बदलीनंतर पंजाब आणि हरयाणा हायकोर्टात ते मुख्य न्यायाधीश रविशंकर झा यांच्यानंतर दुसऱ्या स्थानी असतील.