नवी दिल्ली ;- दिल्ली व मुंबई दरम्यान हरित महामार्ग बांधण्यात येणार असून या महामार्गामुळे सहा राज्यांच्या मागास भागांचा विकास होईल, महिनाभरात या कामास सुरुवात करण्यात येईल अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिली.
देशाची राजधानी असणा-या दिल्ली व आर्थिक राजधानी मुंबई दरम्यान हरित महामार्ग उभारण्याचा निर्णय ऐतिहासिक व देशाला नवी दिशा देणारा असल्याचे श्री. गडकरी म्हणाले. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने दिल्ली व मुंबई दरम्यान हरित महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे आज परिवहन भवनात आयोजित एका कार्यक्रमात या महामार्गाविषयी श्री. गडकरी यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली.
श्री गडकरी म्हणाले, या महामार्गामुळे उभय शहरातील अंतर १३० कि.मी. ने कमी होणार असून इंधन व वेळेची बचत होणार आहे. दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांतील मागास भागातून हा महामार्ग जाणार असल्याने या भागातील पायाभूत प्रश्न सुटतील. या महामार्गाच्या जमीन अधिग्रहणासाठी सरासरी ७ कोटी रूपये प्रति हेक्टर खर्च येणार असून या दरामुळे केंद्र शासनास १६ ते २० हजार कोटींची बचत होणार असल्याचेही श्री गडकरी यांनी सांगितले.
निविदा तयार : महिन्याभरात कामास सुरुवात
प्रस्तावित दिल्ली-मुंबई हरित महामार्गावरील वडोदरा ते मुंबई दरम्यानचा रस्ता हा ५ पॅकेज मध्ये बांधण्यात येणार असून यासंदर्भातील निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. तसेच, या कामासाठी ४४ हजार कोटींचा खर्च येणार आहे व येत्या महिन्याभरात या कामांस सुरुवात होणार असल्याचे श्री. गडकरी यांनी सांगितले. तसेच, दिल्ली ते वडोदरा पर्यंतच्या मार्गाची संरचना (अलायमेंट) पूर्ण झाली असून याच वर्षी कामाला सुरुवात होणार आहे.
असा जाणार दिल्ली मुंबई हरित महामार्ग
सध्या अस्तित्वात असलेल्या दिल्ली-मुंबई महामार्गापासून नवीन हरित महामार्ग सुरु होणार आहे. पुढे हा महामार्ग हरियाणा मधून राजस्थानात जाईल येथे जयपूर रिंगरोड पासून अलवर आणि सवाई माधोपूर मार्गे मध्यप्रदेश व गुजरात मध्ये वडोदरा असा प्रवेश करत ठाणे मार्गे मुंबई पर्यंत हा महामार्ग जाणार आहे असे श्री. गडकरी यांनी सांगितले.
या महामार्गामुळे असा फायदा होणार
दिल्ली-मुंबई हरित महामार्गामुळे सध्या या शहरांमध्ये असलेले अंतर १३० कि.मी. ने कमी होणार आहे. त्यामुळे, वेळेची व इंधनाची बचत होणार आहे. या महामार्गावर नियंत्रण कक्ष असतील मात्र, कुठल्याही पध्दतीचे चेक पोस्ट आणि दुकाने नसतील. या महामार्गावर चार चाकी वाहने १२५ कि.मी. प्रति तास वेगाने तर ट्रक ८० ते १०० कि.मी. प्रति तास वेगाने धावू शकतील. यामुळे व्यापार उदिम वाढण्यासही मदत होणार आहे.