नवी दिल्ली: हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातली भाजपचे खासदार रामस्वरुप शर्मा यांचा संशायस्पद मृत्यू झाला आहे.
दिल्लीच्या राम मनोहर लोहिया रुग्णालयाजवळच शर्मा यांचं खासदार निवासस्थान आहे. याच घरात आज सकाळी त्यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण समजू शकलं नसून त्याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी 8.30 वाजता त्यांना गोमती अपार्टमेंटमध्ये खासदार रामस्वरुप शर्मा यांनी आत्महत्या केल्याची खबर मिळाली. पोलीस अधिकारी जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा शर्मा यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून अधिक तपास करत आहे. दरम्यान, शर्मा यांच्या मृत्यूमुळे भाजपच्या संसदीय दलाची आज होणारी बैठक रद्द करण्यात आली आहे.