दिल्लीत भाजपाला धक्का : उमेदवारी न मिळाल्याने खा. उदित राज यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

0

नवी दिल्लीः ऐन निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीतील उत्तर पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे विद्यमान खासदार उदित राज यांचा पक्षाने पत्ता कट केल्याने नाराज होऊन त्यांनी आज बुधवारी कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान यावेळी त्यांनी दलितांसाठी आवाज उठवणे चुकीचे आहे का, असा प्रश्नही विचारला आहे. उदित राज हे दलित समाजातील नेते असून काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी देखील उदित राज यांचे काँग्रेसमध्ये स्वागत केले आहे. भाजपने दिल्लीतील लोकसभेच्या ६ जागांवरील उमेदवारांची यादीची घोषणा केली होती. केवळ या जागेवर पक्षाने उमेदवाराचे नाव निश्चित केले नव्हते.

उदित राज यांनी मंगळवारी भाजपाला सोडचिठ्ठी देणार असल्याचे संकेत दिले होते. उदित राज हे दिल्लीतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील खासदार आहेत. मात्र, यंदाच्या निवडणुकीत भाजपाने उदित राज यांना डावलून गायक हंसराज यांना उमेदवारी दिली आहे. भाजपाने मला तिकीट नाकारुन अन्याय केला आहे. मी अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार नाही. पण भाजपाने मला पक्ष सोडण्यासाठी भाग पाडले असून मी अद्याप याबाबत निर्णय घेतलेला नाही, असे त्यांनी मंगळवारी म्हटले होते. अखेर बुधवारी सकाळी उदित राज यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Leave A Reply

Your email address will not be published.