दिलासादायक ; राज्यात दररोज १३ टक्के रुग्णांना डिस्चार्ज

0

मुंबई : कोरोना व्हायरसने देशात थैमान घातले आहे. भारतातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या महाराष्ट्रात आढळली आहे. त्यामुळे राज्यातील मुंबईसह पुणे ही शहरं कोरोनाची हॉटस्पॉट ठरली आहे. दरम्यान, राज्यातील वाढत्या करोनाग्रस्तांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर एक चांगली बातमी आहे. राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच आता करोनाबाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढलं आहे. राज्यात दररोज १३ टक्के लोक बरे होऊन घरी जात आहेत. तर केवळ एक टक्के रुग्णच अत्यवस्थ असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात सुरुवातीला एकूण १४ हॉटस्पॉट होते. आता ही संख्या ५ वर आली आहे. मुंबई महानगर परिसर, पुणे महानगर परिसर, नागपूर आणि नाशिक असे हॉटस्पॉट असून मालेगाववरही विशेष लक्ष देण्यात येणार आहे. राज्यात दररोज सुमारे ७ हजार करोना चाचण्या केल्या जातात. काल ७११२ चाचण्या केल्या. करोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी पूर्वी ३.१, त्यानंतर ५ आणि आता ७.१ दिवसांवर गेला आहे. हा जो ७ दिवसांचा कालावधी आहे तो अजून वाढविण्याचा उद्देश आहे, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, राज्यात काल १५० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून राज्यात दिवसाला २६ रुग्ण बरे होत आहेत. हे आश्वासक चित्रं आहे. विशेष म्हणजे बरे होऊन घरी जाणाऱ्यांमध्ये ९१ ते १०० वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. राज्यातील ८३ टक्के लोकांना करोनाची लक्षणे नाहीत. तर १७ टक्के लोकांना सौम्य स्वरुपाची लक्षणे आहेत. राज्यातील करोनामुळे होणारा मृत्यूदर हा ७वरून ५वर आला आहे. करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने दोन समित्या स्थापन केल्या आहेत, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.