मुंबई: देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून, कोरोना बाधितांची संख्या जवळपास १२ हजारांच्या वर गेली आहे. तर देशात आतापर्यंत ३९२ लोकांचा कोरोनानं मृत्यू झाला आहे.कोरोनाचा देशातील सर्वाधिक फटका मुंबईला बसला आहे. मात्र, करोनाच्या विळख्यात सापडलेल्या मुंबईसाठी दिलासादायक बातमी आहे. बुधवारी मुंबईत नवीन रुग्णांची नोंद आदल्यादिवशीच्या तुलनेत ३५ टक्क्यांनी घटली आहे. मुंबईत बुधवारी 140 नवीन रुग्णांची नोंद झाली तर 2 रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या ११ दिवसांतील करोना रुग्णांचा हा सर्वात कमी आकडा आहे. गेल्या आठवड्यात या व्हायरसमुळे रोज ९ ते १६ रुग्णांचा मृत्यू होत होता. पालिकेने रुग्णांच्या टेस्टिंगचे मापदंड बदलले आहेत. त्याचा हा परिणाम असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
पालिकेने गेल्या तीन दिवसांपासून टेस्टिंगचे मापदंड बदलले आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. मुंबईत आतापर्यंत ११४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सोमवारी ९ जणांचा मृत्यू झाला होता. गेल्या शुक्रवारपर्यंत मुंबईतील मृतांचा आकडा दोन अंकी होता. काल बुधवारी ही संख्या केवळ दोनवर आली आहे. काल मुंबईत एका ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. त्याशिवाय एका ५० वर्षीय महिलेचाही मृत्यू झाला. काल मुंबईतच नव्हे तर संपूर्ण राज्यातली करोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं पाहायला मिळालं. काल राज्यात २३२ नवे रुग्ण सापडले. मंगळवारच्या तुलनेत हा आकडा ३४ टक्क्याने कमी होता. त्याशिवाय काल दिवसभरात राज्यात ९ लोकांचा मृत्यू झाला. गेल्या सहा दिवसातील ही संख्याही सर्वात कमी आहे. राज्यातील कोरोना बाधितांची संख्या ३ हजारावर गेली आहे.