मुंबई ;- मराठीतील कलरफुल अभिनेत्री पुजा सावंतचा ‘लपाछपी’ हा सिनेमा चांगलाच गाजला होता. या सिनेमातील तिच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्काराने घेतली. यात आता आणखीन एका सन्माननीय पुरस्काराचा समावेश झाला आहे. भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके यांच्या 149व्या पुण्यतिथी निमित्त ‘दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ पुरस्काराचा मान पुजा सावंतला मिळाला आहे. येत्या 21 एप्रिल ला वांद्रे येथील सेंट अॅड्रयूज ऑडीटोरियममध्ये पुजाला हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
मराठी चित्रपटसृष्टीत दादासाहेब फाळके पुरस्कार हा अत्यंत मानाचा आणि मोलाचा मानला जातो. याआधीही ‘लपाछपी’ चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. जगभरातूनसुध्दा ‘लपाछपी’ आणि पुजा सावंतच्या अभिनयाची दखल घेतली आहे. ‘श्रावणक्वीन’ झाल्यानंतर पुजा सावंतने ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. ‘क्षणभर विश्रांती’ या तिच्या पहिल्याच चित्रपटात तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. यानंतर झकास, सतरंगी रे, पोस्टर बॉईज, निळकंठ मास्टर, दगडी चाळ, भेटली तु पुन्हा, लपाछपी या चित्रपटात तिने आपले अभिनय कौशल्य दाखविले. पुजाच्या अभिनयावर आणि तिच्या सौंदर्यावर अनेक चाहते फिदा आहेत.