दहावीचा भूगोलाचा पेपर न घेता विद्यार्थ्यांना सरासरी गुण द्या

0

मुंबई : करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाउनमुळे इयत्ता दहावीचा भूगोल विषयाचा राहिलेला पेपर न घेता विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्यात यावे अशी मागणी भाजपा नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे. या प्रकरणी येत्या ४ दिवसांत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासनही त्यांनी दिलं आहे.

राज्यातील जवळपास १७ लाख ६५ हजारांहुन अधिक विद्यार्थांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. भूगोल विषयाची परीक्षा अनिवार्य आहे. त्यामुळे हा पेपर आताच्या परिस्थितीत घेणे अवघड असल्याचे वास्तव आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढत आहे. या परिस्थितीत सरकारने दहावीच्या भूगोल विषयाची परीक्षा रद्द करावा, अशी मागणी पालकांकडून होत आहे. या परीक्षेबाबत १४ एप्रिलनंतर निर्णय घेणार असल्याचे सरकारने सांगितले आहे. परंतु आता लॉकडाऊन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे.

दहावीचा भूगोलाचा पेपर दि. २३ मार्च रोजी घेण्यात येणार होता. मात्र, कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा पेपर रदद करण्यात आला. दरम्यान, सध्या सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे तसंच करोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येमुळे तो पेपर घेणं शक्य नसल्याचं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या दृष्टिकोनातून हा पेपर रद्द करून सरासरी गुण देण्यात यावे, अशी भूमिका मुनगंटीवार यांनी प्रा. वर्षा गायकवाड यांच्याशी दूरध्वनीद्वारे झालेल्या चर्चेदरम्यान केली. या मागणीच्या अनुषंगाने सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.