वाराणसी :
सेव्ह इंडियन फॅमिली फाऊंडेशन (एस.आय.एफ.एफ.) या पत्नीपीडित पुरुषांच्या संघटनेने जिवंत पत्नीचे श्राद्ध घालून संस्थेचे दहावे वर्ष साजरे केले. मागच्या आठवडयात उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये गंगा नदीच्या किनाऱ्यावर संपूर्ण देशभरातून १५० पुरुष जमले होते. पूर्व पत्नीने दिलेल्या त्रासामुळे मनात आलेला कडवटपणा, नकारात्मकता यामधून मुक्ती मिळवण्यासाठी या सर्व पुरुषांनी पवित्र गंगा नदीमध्ये स्नान केले. हुंडा विरोधी कायद्याच्या गैरवापराविरोधात लढा देण्यासाठी एस.आय.एफ.एफ. ही संघटना २००७ साली स्थापन झाली.भारतीय कायदे हे निष्पक्ष नसून पुरुषांच्या बाबतीत पक्षपातीपणा केला जातो. प्राण्यांच्या अधिकारासाठी मंत्रालय आहे पण पुरुषांना संरक्षण देण्यासाठी कोणतेही मंत्रालय नाही असे या संघटनेचे संस्थापक सदस्य राजेश वाखारीया म्हणाले. महिलेचा अहंकार दुखावला कि, त्या थेट पुरुषांविरोधात लैंगिक छळाच्या तक्रारी दाखल करतात असे वाखारीया म्हणाले.गंगेच्या काठावर जमलेल्या या पत्नीपीडित पुरुषांनी जिवंत असलेल्या पूर्व पत्नीच्या नावाने श्राद्धविधीही केला. विधी करणारे सर्व पुरुष त्यांच्या पत्नीपासून विभक्त झाले आहेत. पहिल्या लग्नाच्या कटू आठवणी पुसून टाकण्यासाठी संघटनेने इथे जमलेल्या १५० पुरुषांना पिशाचिनी मुक्ती पूजा करण्याचा सल्ला दिला.बायको ही वर्षानुवर्ष नवऱ्याचा छळ करुन त्यांची मनशांती, सुख, समाधान हिरावून घेते. पत्नीकडून ज्या खोटया तक्रारी नोंदवल्या जातात त्याचा निषेध म्हणून आम्ही अशा प्रकारचे श्राद्ध घालून निषेध केला असे या संघटनेचे सदस्य अमित देशपांडे यांनी सांगितले. भारतीय दंड विधान संहितेतील कलम ४९८ अ विरोधात लढण्यासाठी एस.आयएफ.एफ.ची प्रामुख्याने स्थापना झाली आहे. हुंडा विरोधी कायद्यासंबंधी हे कलम आहे. वैवाहिक बलात्काराला गुन्हेगारीच्या कक्षेत आणण्यालाही या संघटनेने विरोध केला होता. अशा प्रकारचे कायदे आले तर नाते टिकूच शकत नाही असा त्यांचा युक्तिवाद होता. एस.आय.एफ.एफ.ची संपूर्ण देशात २०० केंद्रे असून या संस्थेचे ४ हजार सदस्य आहेत.