त्या मद्यविक्रेत्याचा परवाना रद्द करा

0

कोरोना व्हायरसने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. त्याच्या नियंत्रणासाठी संपूर्ण जग विविध उपाययोजना करीत आहे. महाराष्ट्रास भारतात वेळीच धोका लक्षात घेऊन लॉकडाऊन (संचारबंदी) जाहीर केली. 14 एप्रिलपर्यंत असलेली ही संचारबंदी 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली.
रूग्ण आणि कोरोना संशयित रूग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर, नर्सेस आणि वैद्यकिय सेवक आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र झटत आहेत. गर्दी रोखण्यासाठी आमचे पोलिस दिवसरात्र पहारा देत आहेत. अशा परिस्थितही लॉकडाऊन काळात सर्व अस्थापने बंद असतांना कायदा हातात घेऊन सीलबंद मद्याच्या गोदामाचे सील उघडून सर्रास लाखो रूपयांच्या मद्याची विक्री करणारे महाभाग म्हणजे प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणार्‍यांचीच औलाद म्हणावी लागेल. एक कोरोना बाधित रूग्ण झपाट्याने 430 जणांना बाधित करतो असे भयानक वास्तव असतांना सर्रास मद्यविक्री करणे म्हणजे कायदा तर हातात घेतलाच असून असे कृत्य म्हणजे पैशाच्या लालसेपायी त्यांनी देशद्रोह केला आहे. असे कृत्य करणार्‍याला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांकडून पाठीशी घेतले जात असेल तर कुंपणच शेत खातंय असेच म्हणावे लागेल. कारण लॉकडाऊन असतांना जळगाव येथील आर.के. वाईन्स या मद्यविक्रीच्या दुकानातून मद्य विक्री होतेच कशी ? पोलिस अधिक्षकांना एकाने गुप्त माहिती दिल्यावरून काल एलसीबीने धाड टाकली धाडीत लाखो रूपयांचे मद्य रंगेहात पकडले गेले. दोघा संशयितांनाही ताब्यात घेऊन पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला. एलसीबीने धाड टाकली म्हणून याचा भंडाफोड झाला अन्यथा हे असेच चालू राहिले असते. हा मद्यसाठा जळगाव जवळच नशिराबाद स्थित येथील क्रिश ट्रेडर्स या मद्याच्या गोडावूनचे सील उघडून आणले जात होते. आणि हा प्रकार नित्याचा होता असे समजते. काही दिवसांपूर्वी याच आर. के. वाईन्सवर मद्यविक्री होत असतांना कारवाई झाली परंतु मद्याचा साठा मोजला जात होता असे कारण पुढे करून त्यावर होणर्‍या कारवाईला ब्रेक लागला. आणि ते प्रकरण दाबले गेले. आता सीलबंद ोदाम उघडून सर्रास दारू साठा विक्री होताना रंगेहात पकडले गेले. मद्यसाठा ज्या कारमधून येत होता. त्या कारसह मद्यसाठा जप्त करण्यात आला. त्याचा रितसर पंचनामा झाला. दोघा संशयितांना ताब्यात घेऊन त्यांचेवर गुन्हाही दाखल झाला. परंतु दारूबंदी खात्याचे अधिकारी मात्र कागदी घोडे नाचवण्यातच काल दिवसभर व्यस्त होते. त्या गोदामावर काय कारवाई केली हे ते दिवसभरात सांगू शकले नाहीत. आता माहिती देतो, नंतर देतो अजून कारवाई अपूर्ण आहे वगैरे सांगून कालची वेळ मारून नेली. याचा अर्थ त्या गोदामावर थातूर मातूर कारवाई केली जाईल. लॉकडाऊनच्या काळात सीलबंद गोदामाचे सील उघडून सर्रास दारू विक्री करणार्‍या गोदाम मालकाचा परवानाच रद्द झाला पाहिजे. परंतु तसे होईल याची शक्यता कमीच म्हणून दारूबंदी खात्याचे संबंधित अधिकारी दहिवडे यांचेवरच शासनाने कारवाई करण्याची गरज आहे.
आर. के. वाईन्सचे संचालक राजू नोटवानी ही एक बडी हस्ती असून त्यांचेवर कारवाई होणार नाही अशी काल दिवसभर जळगावात चर्चा होती. कारण त्यांना बड्या राजकीय नेत्यांचा पाठिंबा आहे. बडे राजकीय नेते कोण? याबाबत मात्र कुणी बोलायला तयार नाही. जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे हे कर्तव्यतत्पर अधिकारी आहेत.  सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त असतांना त्यांची कारकीर्द गाजलेली आहे. तत्कालीन सहकार मंत्री सुभाष देशुख यांच्या अवैध बंगल्याचे प्रकरण डॉ. ढाकणे यांनी चव्हाट्यावर आणले होते. त्यामुळे कोणत्याही दबावाला जिल्हाधिकारी ढाकणे हे बळी पडणारे नाहीत. म्हणून लॉकडाऊनसारख्या परिस्थितीत असे कृत्य करणार्‍याला धडा शिकवलाच पाहिजे. याबाबत कारवाई करण्यासंदर्भात त्यांनी अश्वस्तही केले आहे. त्यामुळे आता सार्‍यांच्या नजरा जिल्हाधिकार्‍यांकडे लागून आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे एक धडाडीचं व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जातात. जळगाव जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात होणार्‍या कायद्याच्या पायमल्लीची त्यांनी जातीने दखल घेऊन त्यावर कडक कारवाई होईल याबाबत लक्ष घालावे. तसेच या मद्यविक्रेत्यांचे हात वरपर्यंत पोहोचलेले आहेत. त्याचे पाठीमागे बड्या राजकीय नेत्यांचा हात आहे असे जे म्हटले जाते असे जे आरोप होताहेत ते खोडून हीच अपेक्षा.

Leave A Reply

Your email address will not be published.