जळगाव : जिल्ह्यात करोनाचा तिसरा रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. अमळनेर तालुक्यातील मुंगसे येथील एका ६० वर्षीय महिलेला करोना सदृश्य आजाराची लक्षणे दिसून आल्याने तिला जिल्हा रुग्णालयातील करोना संसर्ग कक्षात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, कोरोनाग्रस्त महिलेने मुंबई- औरंगाबाद प्रवास केल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. प्रशासनाने युद्ध पातळीवर उपाययोजना सुरू केल्या असून, तीन दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाग्रस्त महिलेच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेण्यात येत असून, आतापर्यंत १४ जणांना जळगाव येथे हलविण्यात आले आहे.
कोरोनाग्रस्त महिला मुंबई येथे मुलांकडे गेली होती. तीन महिन्यापूर्वी ती मुंगसे येथे मूळ गावी परतली होती. त्यानंतर ती महिला औरंगाबाद येथेही जाऊन आली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. महिलेचा मुंबई- मुंगसे- औरंगाबाद व पुन्हा मुंगसे हा प्रवास झोप उडविणारा आहे. त्या महिलेची प्रकृती बिघडल्यानंतर तिने सावखेडा येथील एका डॉक्टरकडे उपचार केले होते. त्यानंतर चोपडा येथील एका खासगी रुग्णालयात ती महिला उपचार घेत होती. प्रकृती अधिक खालावल्याने शुक्रवारी ती महिला जळगाव येथे दाखल झाली होती. तिच्या घशातील स्वॅब घेऊन ते चाचणीसाठी धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले होते. या चाचणीचा अहवाल शनिवारी रात्री उशिरा जिल्हा रुग्णालय प्रशासनाला प्राप्त झाला आहे. तो पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनासह आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे.
दरम्यान, वैद्यकीय पथक आज सकाळीच मुंगसे येथे दाखल झाले आहे. मुंगसेसह परिसरातील सात किलोमीटर अंतरावरील गावे सील करण्यात आली आहेत. या महिलेच्या संपर्कातील सुमारे १४ जणांना जळगाव येथे हलविण्यात आले आहे. १२ जण मुंगसेचे असून, सावखेडा येथील एक डॉक्टर व त्यांच्या पत्नी असे दोन जण आहेत. वैद्यकीय पथकाकडून होम टू होम ग्रामस्थांची तपासणी सुरू झाली आहे.