Wednesday, May 18, 2022

तोडीपाणी चव्हाट्यावर !

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

कोरोना महामारीच्या दोन लाटांमुळे तब्बल पावणेदोन वर्षाच्या प्रदिर्घ कालावधीनंतर जळगाव महानगरपालिकेची महासभा ऑफलाईन पार पडली आणि महापालिकेतील गैरव्यवहारामुळे उपहापौर आणि विरोधी नगरसेवक हातघाईवर आले.  नागरिकांच्या मुलभूत सुखसोयींवर आणि शहराच्या विकास कामासंदर्भात चर्चा होऊन निर्णय घेण्याऐवजी एकमेकांवर तोडपाणीचे आरोप – प्रत्यारोप करीत गोंधळ घातला होता. एकमेकांवर केलेल्या गैरव्यवहाराच्या आरोपामुळे इभ्रत गेली.

- Advertisement -

महासभेत सुरवातीला तासभर तर उपमहापौर कुलभूषण पाटील यांना व्यासपीठावर बसण्याचा अधिकार नाही. त्यांना खाली उतरवा या संदर्भात भाजपचे स्वीकृत नगरसेवक कैलास सोनवणे यांनी सभेत गोंधळ घातला. महासभेचे कामकाजच होऊ दिले नाही. हे सर्व होत असतांना वैयक्तिक हेवेदावे चव्हाट्यावर आणले जात होते. उपमहापौर तोडपाणी करतात, असा आरोप नगरसेवक कैलास सोनवणेंनी केला तर माझ्यावर केलेले आरोप सिध्द झाले तर  मी राजीनामा देईन असे प्रतिउत्तर कुलभूषण सोनवणेंनी दिले. त्यानंतर तुम्ही सत्तेवर असतांना काय दिवे लावले आहेत हे जगजाहीर आहे. त्यामुळे तुमचा गैरव्यवहार काढल्यास ते महागात पडेल असा आरोप महापौर कुलभूषण पाटील यांनी कैलास सोनवणेंवर केला. म्हणजे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेल्यानंतर जळगावकरांच्या सेवेऐवजी स्वत:च्या मिळणाऱ्या मेव्यासंदर्भात जाहीरपणे आपसात हमरी – तुमरीवर भांडतात या त्यांच्या वागण्याने जळगावकरांची मान शरमेने खाली गेली.

- Advertisement -

महापालिकेत असलेली भाजपची सत्ता गेली. महापालिकेत सत्तांतर होऊन शिवसेनेचा भगवा फडकला तथापि सत्तांतरानंतरही येरे माझ्या मागल्या चालू आहे. जळगावातील रस्त्यावरील जीव घेणे खड्डे, शहर स्वच्छतेचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, गटारी, विजेचा प्रश्न आदि मुलभूत प्रश्न ऐरणीवर असतांना आमचे नगरसेवक स्वत: तोडपाणीवरून सभागृहात गोंधळ घालतात ही जळगावकरांच्या दृष्टीने नामुष्कीच म्हणावी लागेल. राज्याचे उपमुख्यमंत्री जळगावात आल्यानंतर जळगाव शहरातील रस्त्यांच्या समस्येबाबत ताशेरे ओढतात.

अमृत पाणी पुरवठा योजना, भुयारी गटारी योजना आणि अकार्यक्षम प्रशासनासंदर्भात त्यांनी ताशेरे ओढले. महानगरपालिकेच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली. परंतु महापालिकेत शिवसेनेची सत्ता असली तरी महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचीच सत्ता आहे. त्यामुळे शिवसेनेला बदनाम करण्याचे यामागे राजकारण असल्याचे सांगून सत्ताधारी शिवसेना आपल्यावर पांघरूण टाकते, असे किती दिवस चालणार?

जळगाव महानगरपालिकेत भाजपची अडीच वर्षे सत्ता होती. महापालिकेत भाजपचे पाशवी बहुमत असतांना भाजपने शहर विकासासाठी काहीही केले नाही. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या पुढाकाराने भाजपचे नगरसेवक फुटले. सत्तांतर झाले. शिवसेनेचा भगवा फडकला. पण शिवसेनेच्या महापौर, उपमहापौर आणि नगरसेवकांकडून फार मोठी अपेक्षा होती. परंतु ती फोल ठरली. खुद्द एकनाथराव खडसेंनी शिवसेनेला घरचा  आहेर दिला. महापौर, उपमहापौर आणि नगरसेवक अकार्यक्षम असल्याचा ठपका नाथाभाऊंनी ठेवला.

शासकीय निधीच्या होणाऱ्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी केली. स्पेशल ऑडिटचीही मागणी केली. आघाडी सरकारच्या घटक पक्षातील जबाबदार नेत्यांकडून असा आरोप होत असेल तर शिवसेनेला आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. भर महासभेत व्यासपीठावर जाऊन नगरसेवक हातघाईवर येतात. उपमहापौराला धक्काबुक्की करतात. हे कशाचे लक्षण आहे. सत्ता गेल्याच्या नैराश्येतून भाजप नगरसेवक कैलास सोनवणे व इतर नगरसेवक असा पवित्रा घेताहेत असा आरोप उपमहापौर करतात. हा सर्व गोंधळ पाहून समाजसेवक दीपक गुप्ता यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून महापालिका बरखास्त करा अशी मागणी केली. सभागृहातील या गोंधळाबरोबरच राष्ट्रगीताचा अवमान झाला तरी त्याचे कोणाला सोयरसुतक नाही. भाजपतर्फे राष्ट्रगीताचा अवमान झाला, असा आरोप केला जातोय. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तर जिल्हाधिकारी पोलिस अधीक्षकांकडे लेखी निवेदन देऊन याबाबत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केलीय.

एकंदरीत जळगाव महानगरपालिकेचा कारभार सक्षमपणे करण्यास आमचे नगरसेवक कमी पडतात हे स्पष्ट दिसून आले. जळगावकरांच्या मुलभूत समस्या सोडविण्यासाठी जे प्रयत्न व्हायला हवेत ते होत नाहीत. जळगाव विधानसभा मतदार संघातील आमदार नगरपालिकेच्या राजकारणातून बाहेर पडत नाही. संपूर्ण जळगाव शहराचे ते आमदार म्हणून प्रतिनिधीत्व करतात असे वाटतच नाही. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचेकडून अपेक्षा आहेत. त्यांनी हस्तक्षेप करून जिल्ह्यावर आपला ठसा उमटवावा हीच अपेक्षा. तथापि ते सुध्दा आपल्याच सत्ताधारी घटक पक्षातील नेत्यावर आरोप – प्रत्यारोपाच्या राजकारणात अडकतात ते अडकू नये हीच अपेक्षा. तसेच जिल्ह्याचे नेते म्हणून त्यांनी नि:पक्षपातीपणाची भूमिका बजवावी. तरच जिल्हावासीय तुम्हाला डोक्यावर घेतील.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या