ते ऑनर किलिंग नाहीच ; पतीनेच पत्नीला पेटवल्याचे उघडकीस

0

अहमदनगर – अहमदनगरमधल्या पारनेर तालुक्यातील निघोज गावात घडलेल्या  ‘ऑनर किलिंग’प्रकरण वेगळ्याच वळणावर येऊन ठेपले आहे. ऑनर किलींग म्हणून या प्रकरणाचा खूप गाजावाजा झाला पण प्रत्यक्षात पतीनेच पत्नीला पेटवून दिले होते अशी धक्कादायक बाब आता समोर येत आहे. पोलिस तपासात जखमी झालेला फिर्यादी मंगेश रणसिंग यानेच पत्नी रुक्मिणीच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिल्याचे पोलिसांनी केलेल्या चौकशीत आढळले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक सागर पाटील, उपअधीक्षक मनीष कलवानीया, पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार, उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे यांनी घटनास्थळाला भेट देत स्थानिक व्यक्तींकडे, रुक्मिणीच्या लहान भावंडांकडे कसून चौकशी केली. या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या आहेत. मंगेश या तक्रारीवरून त्याची पत्नी रुक्मिणीच्या काही नातेवाइकांना पोलिसांनी अटक केली आहे मात्र आता या घटनेला वेगळेच वळण गेल्यानंतर अटकेतील नातेवाईकांना लवकरच दिलासा मिळण्याची आशा आहे

सहा महिन्यांपूर्वी मंगेश व रुक्मिणीने आंतरजातीय प्रेमविवाह केला. विवाहाला दोघांच्याही कुटुंबांचा विरोध नव्हता. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच मंगेशने रुक्मिणीला त्रास देण्यास सुरुवात केली. किरकोळ कारणांवरून तो तिला मारहाण करायचा. घटनेच्या आधी सलग तीन दिवस मंगेशने रुक्मिणीला मारहाण करत होता. या मारहाणीला कंटाळून रुक्मिणी माहेरी निघून गेली. त्यानंतर रुक्मिणीची आई मोलमजुरीला जाताना रुक्मिणी व तिच्या लहान भावंडांना घरात ठेवून दाराला बाहेरुन कुलूप लावत असे. घटनेच्या दिवशी घरात रुक्मिणीसह तिची लहान भावंडे, निंनचू (६), करिश्मा (५), विवेक (३) होते. आई घराला बाहेरुन कुलूप लावून मोलमजुरीसाठी निघून गेली. वडीलही मजुरीसाठी बाहेर पडले होते.

रूक्मिणीच्या आई-वडीलांचे घर लाकडी खांडांचे आहे. घराच्या माळवदाचे एक खांड पडलेले आहे. याची संधी साधत १ मे रोजी मंगेशने पडलेल्या भागातून घरातून प्रवेश केला. मंगेशने सोबत बाटलीतून पेट्रोल आणले होते. सोबत आणलेले पेट्रोल मंगेशने रुक्मिणीच्या अंगावर ओतले व तिला पेटवले. रुक्मिणीने पेट घेतल्यावर तिने मंगेशला मिठी मारली. आरडाओरडा व घरातून येणारे धुराचे लोट पाहून परिसरातील नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली. दरवाजाला कुलूप असल्याने टिकावाच्या सहाय्याने दरवाजा तोडण्यात आला. गंभीर भाजलेल्या अवस्थेतील रूक्मिणी स्वत: घराबाहेर आली. तिच्या पाठोपाठ मंगेशही आला. रुग्णवाहिकेतून रुक्मिणीला व मंगेशला सुरुवातीला नगर येथील जिल्हा रुग्णालयात व त्यानंतरपुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्यात आले. पुण्यात उपचारांदरम्यान रुक्मिणीचा मृत्यू झाला. पोलिसांनी मंगेशच्या फिर्यादनुसार रूक्मिणीच्या ऑनर किलिंगचा गुन्हा दाखल केला.

Leave A Reply

Your email address will not be published.