हैदराबाद -तेलंगणमध्ये सत्तेवर असणाऱ्या तेलंगण राष्ट्र समितीच्या (टीआरएस) एका नेत्याचे अपहरण करण्यात आले. त्यामागे नक्षलवादी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. एन.श्रीनिवास राव (वय 45) असे अपहृत नेत्याचे नाव आहे. राव यांना अपहरणानंतर शेजारच्या छत्तिसगढ राज्यात नेण्यात आल्याचा अंदाज आहे.
सोमवारची मध्यरात्र उलटल्यानंतर सुमारे पंधरा जणांचा समावेश असणारा एक गट राव यांच्या घरी आला. त्या गटाकडे काही शस्त्रास्त्रे आणि काठ्या होत्या. त्या गटाने राव यांना घराबाहेर ओढत नेले. त्या गटाला रोखण्याचा प्रयत्न राव यांच्या पत्नीने आणि मुलाने केला. मात्र, त्या तिघांनाही मारहाण करण्यात आली.राव यांच्या कुटूंबीयांना बंदुकीचाही धाक दाखवण्यात आला. तो गट राव यांना घेऊन पसार झाला. राव यांना छत्तिसगढला नेले गेल्याच्या अंदाजावरून त्यांच्या शोधासाठी कुटूंबीय आणि सुमारे दोनशे ग्रामस्थ रवाना झाले. राव यांच्या अपहरणाची औपचारिक तक्रार झाली नसली तरी स्थानिक पोलिसांनीही त्यांची सुटका होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत.