नवी दिल्ली – बीएसएफचे बडतर्फ जवान तेजबहादूर यादव यांची उमेदवारी रद्द केल्याने सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाकडे स्पष्टीकरण मागितले आहे. वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जवान तेजबहादूर यादव रिंगणात उतरले होते. दरम्यान निवडणूक आयोगाला २४ तासात उत्तर देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
सैनिकांना मिळणाऱ्या अन्नाच्या गुणवत्तेवर आवाज उठवत सोशल माध्यमांवर व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या, सीमा सुरक्षा दलातील बडतर्फ जवान तेज बहादूर यादव यांना सपा-बसपा आघाडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसी मतदार संघातून उमेदवारी दिली होती. तेजबहादूर यांच्या उमेदवारी अर्जातील विसंगती आणि त्रुटीबाबत १ मे रोजी निवडणूक अधिकाऱ्यांपुढे सुनावणी झाली. त्यावेळी त्यांचा अर्ज बाद करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी जाहीर केले होते.यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.