नवी दिल्ली | पुढच्या वर्षी पहिल्या तीन-चार महिन्यांत देशातील लोकांना कोरोनावरील लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. तसेच, जुलै-ऑगस्टपर्यंत जवळपास २५-३० कोटी लोकांना लस देण्याची योजना आहे. त्यानुसार आम्ही तयारी करीत आहोत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे.
‘येत्या तीन ते चार महिन्यांमध्ये करोनावरील लस उपलब्ध होईल, असा मला विश्वास असून ती देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला जाईल’, असे ते म्हणाले. आरोग्यसेवक, करोनायोद्ध्यांना स्वाभाविकपणे प्राधान्य दिले जाईल. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक आणि विविध आजार असणाऱ्यांना लस दिली जाईल. लशीच्या वितरणासाठी अत्यंत बारकाईने नियोजन केले जात आहे, असे ते म्हणाले. ‘
दरम्यान, दिल्लीतील बुरारी येथील निरंकारी समागम मैदानावर आंदोलन करत असलेल्या शेकडो आंदोलकांना आवाहन करताना डॉ. हर्षवर्धन म्हणाले, “माझी सर्वांना विनंती आहे की त्यांनी कोविडचे नियम लक्षात ठेवावेत तसेच त्यानुसार वर्तन करावं. यामध्ये तोंडाला मास्क लावणे आणि फिजिकल डिस्टंसिंगचे पालन करणे आवश्यक आहे. आपल्या आरोग्यासाठी ही महत्वाची बाब आहे.”