दिल्ली | लोकशाही न्यूज नेटवर्क
मुस्लिमांमधील तिहेरी तलाकच्या पद्धतीवर बंदी घालणारे तिहेरी तलायक विधेयक लोकसभेत सादर करण्यात आले आहे. कायदामंत्री रवीशंकर प्रसाद यांनी विधेयक लोकसभेत मांडलं आहे. विशेष म्हणजे तिसऱ्यांदा लोकसभेत हे विधेयक सादर करण्यात आले. रवीशंकर प्रसाद यांनी आधीच हे विधेयक पुन्हा संसदेत मांडण्यात येईल असं स्पष्ट केलं होतं. रवीशंकर प्रसाद यांनी विधेयक मांडताच लोकसभेत विरोधकांनी गदारोळ घालण्यास सुरुवात केली.
सोळावी लोकसभा गेल्या महिन्यात विसर्जित झाली असून तिहेरी तलाकचे विधेयक हे संसदेत मंजूर झालेले नाही, ते राज्यसभेत पडून आहे. लोकसभा विसर्जित होत असताना जी विधेयके राज्यसभेत दाखल असतात ती बाद होत नाहीत, पण जी विधेयके लोकसभेत संमत होऊन राज्यसभेत पडून आहेत ती मात्र बाद होतात. तलाक विधेयकाला विरोधी पक्षांनी राज्यसभेत कसून विरोध केला आहे व तेथे सरकारचे संख्याबळ अपुरे आहे, त्यामुळे ते मंजूर होऊ शकले नाही.
तलाकविरोधी विधेयक पुन्हा आणणार का, या विषयावर रवीशंकर प्रसाद यांनी सांगितलं होतं की, तिहेरी तलाकचा मुद्दा हा भाजपच्या जाहीरनाम्यात होता, त्यामुळे हे विधेयक परत आणले जाईल. काँग्रेसकडून विधेयकाच्या मसुद्याला विरोध करण्यात आला असून विधेयक मुस्लिम कुटुंबीयांच्या विरोधात असल्याचं सांगितलं आहे.
काँग्रेस नेते शशी थरुर आणि एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी विधेयकाला विरोध केला असून आक्षेप नोंदवला आहे. विधेयकातील अनेक तरतुदी संविधानाच्या विरोधी असल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे. दरम्यान लोकसभेचं न्यायालय करु नका असं आवाहन रवीशंकर प्रसाद यांनी विरोधकांना केलं.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.