धरणगाव : ‘सरकारी काम अन बारा महिने थांब’, असा काहीसा समज आजही जनसामान्यांमध्ये आहे. परंतु निराधार वृध्द बडगुजर दाम्पत्यांना मात्र आज एक वेगळाच अनुभव आला. राशन कार्डावर धान्य मिळत नाही? अशी तक्रार घेऊन आलेल्या बडगुजर दाम्पत्यांच्या तक्रारीची दखल खुद्द तहसिलदारांनी घेत त्यांना तात्काळ न्याय मिळवून दिला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की , नामे जगन्नाथ सुपडू बडगुजर वय 81 व त्यांची पत्नी देवकाबाई जगन्नाथ बडगुजर वय 78 हे वृध्द दाम्पत्य राशन कार्डावर धान्य मिळत नाही अशी तक्रार घेऊन तहसिल कार्यालय धरणगाव येथे आले होते. हे निराधार दाम्पत्य धान्य मिळत नसल्याची तक्रार घेऊन आलेले पाहून तहसिलदार नितीनकुमार देवरे यांनी स्वतः त्यांच्या तक्रारीची दखल घेतली. संबंधित राशन दुकानदार यांना सांगून या वृध्द दाम्पत्यांना तात्काळ गहू व तांदुळाचा लाभ मिळवून दिला. एवढंच नाही तर त्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत आहे की नाही याबाबत देखील विचारणा केली. आस्थेवाईकपणे चौकशी करून या वृध्द दाम्पत्यांना शासकीय वाहनातून घरी सोडण्याची व्यवस्था केली. या अनुभवाने ते वृध्द दाम्पत्य सुखावले व त्यांनी तहसिलदार साहेबांना शुभाशीर्वाद दिलेत.
या बाबत तहसिलदार साहेबांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की अशा प्रसंगातून आत्मिक समाधान मिळते. याच कारणास्तव मी शेतकरी , विद्यार्थी आणि आबालवृध्दांचीकामे प्राधान्य क्रमाने करतो असेही त्यांनी सांगितले. या निमित्ताने अधिकारी पदावर असलेल्या देवरे साहेबांच्या संवेदनशील व्यक्तिमत्वाची ओळख झाली.