मुंबई : विधानपरिषदेच्या सहाव्या जागेवरुन महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हं आहेत. कारण विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने दुसरा उमेदवार जाहीर केल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. जर काँग्रेस आडमुठेपणा सोडणार नसेल तर मी विधान परिषद निवडणुक लढवणार नाही’, असा इशाराच उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला दिल्याचं सूत्रांनी दिली आहे.
कोरोना’च्या पार्श्वभूमीवर विधानपरिषद निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी उद्धव ठाकरे यांची भूमिका होती. मात्र, तरी देखील काँग्रेसने दुसरा उमेदवार जाहीर केल्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण झाली आहे. विधान परिषद निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी पहिल्यापासून राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा प्रयत्न आहे. यासाठी काँग्रेसने एका जागेवर उमेदवार द्यावा अशी विनंती करण्यात आली होती. मात्र कॉंग्रेसने परस्पर उमेदवार जाहीर केल्यानंतर सहाव्या जागेवरुन महाविकास आघाडीत धूसफूस असल्याचं समोर आलं. काँग्रेसकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी राजेश राठोड यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर थोरातांनी बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर उर्फ पापा मोदी यांचं नाव जाहीर केलं आहे.
असंच सुरु राहिल्यास निवडणूक लढणार नाही, असा निरोप उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब थोरात यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या पवित्र्यानंतर काँग्रेस नेते आपली भूमिका मुख्यमंत्र्यांना कळवणार आहेत. काँग्रेसच्या नेत्यांनी बैठक घेऊन याविषयी चर्चा केली.