बारामती :- बारामती भाजपचा विजय झाल्यास आपण राजकारणामधून निवृत्ती घेऊ असं माजी उप-मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सांगितले आहे. बारामतीच्या काटेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत मतदान केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
‘बारामती भाजपने जिंकली, तर मी राजकारणातून निवृत्ती घेईन पण भाजपला बारामती जिंकता आली नाही तर त्यांनी निवृत्ती घ्यावी’ असं आव्हानही अजित पवरांनी केलं आहे. आज तिसऱ्या टप्प्यात राज्यातील १४ मतदारसंघामध्ये आज सकाळपासून मतदान सुरु आहे. यामध्ये भाजपा आणि राष्ट्रवादीने प्रतिष्ठेचा मुद्दा बनवलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. बारामतीचा गड १०० टक्के राखणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. सुप्रिया सुळे मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असा विश्वास अजित पवार यांनी मतदानानंतर पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केला आहे.