मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सध्या राज्यातील वातावरण चांगलचं पेटलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जुंपली असताना आता छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनीही यात उडी घेतली आहे. मराठा आरक्षण सरकारने केलं तर ठीक, अन्यथा राजकारणाला रामराम करणार आणि राजीनामा देऊन टाकणार असं उदयनराजे एबीपी माझाशी बोलताना म्हणाले आहेत. सर्वांना न्याय मिळत असताना मराठा समाजाने वंचित का राहावं ? अशी विचारणाही यावेळी त्यांना केली.
यावेळी उदयनराजे भोसले म्हणाले की, मी कधीही राजकारण केले नाही. केवळ मराठा समाज नाही तर कोणत्याही समाजावार अन्याय होत असेल तर त्यांच्यासाठीही लढणार, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा लागला तरी राजीनामा देईन, पदावरुन राहून आपण काय करु शकत नसलो तर त्याचा उपयोग काय? वेळ आली तर राजीनामा देईन असं त्यांनी सांगितले. तर पोलीस भरतीवर भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला.
त्याचसोबतच सध्या लोकशाही आहे, राजेशाही असती तर दाखवलं असतं. अन्याय होत असेल तर लोकशाहीच्या राजांनी राजासारखं वागावं इतकचं माझं म्हणणं आहे. लोकांनी निवडून द्यायचं मग त्याच भान ठेवायला हवं, प्रत्येकाला न्याय देण्याची भावना असली पाहिजे. अन्यथा राजेशाही आणा, मग दाखवतो, काय करायचं अन् काय नाही असंही उदयनराजेंनी ठणकावून सांगितले.