जळगाव : विधानपरिषद निवडणुकीतील सर्व उमेदवारांची घोषणा होऊन ही निवडणूक बिनविरोध झाली असली तरीही भाजपकडून डावललं गेलेल्या ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.
विधानपरिषदेच्या सहाव्या जागेसाठी कॉंग्रेसकडून ऑफर आली होती. कॉंग्रेसची ऑफर घेतली असती तर भाजपाचे 6 ते 7 आमदार फुटले असते असा गौप्यस्फोट खडसेंनी केला आहे. कॉंगेसची उमेदवारी घेतली असती तर, भाजपाच्या 6 ते 7 आमदार क्रॉस वोटींग करणार होते. तसे त्यांनी माझ्याकडे मान्य केले होते,असे खडसेंनी सांगितले.
भाजपने गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षातील दिग्गज नेत्यांचे तिकीट कापत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यानंतर आता विधानपरिषदेची उमेदवारीची संधी दिली जाईल अशी इच्छा बाळगणा-यांच्या भाजपा नेत्यांच्या पदरी घोर निराशा आली आहे. यामध्ये प्रामुख्याने एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांचा समावेश आहे. तर, विधानसभेत अशस्वी झालेल्या पंकजा मुंडे यांचे परिषदेत घेऊन राजकीय पुनर्वसन होण्याची आस असलेल्या पंकजांच्या वाटेलाही निराशाच आली आहे. यांच्याऐवजी पक्षाने नवीन लोकांना संधी दिली आहे.
विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी येत्या 21 मे रोजी मतदान होणार आहे. यासाठी सर्वच पक्षांच्या उमेदवारांचा अर्जदेखील निवडणूक आयोगाकडे सादर झाला आहे. भाजपाने चार उमेदवार ऊभे केले आहे. यामध्ये रणजितसिंह मोहिते पाटील, डॉ. अजित गोपचडे, गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके यांचे नाव निश्चित केले. यामुळे पुन्हा एकदा खडसेंसह डावलण्यात आलेले वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजीचा सूर पाहण्यास मिळत आहे. या चारही बड्या नेत्यांना का डावलण्यात आले? याचे कारण देखील अजून समोर आलेले नाही.