नवी दिल्ली :- सध्या देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. निवडणुकीचा पहिला टप्पा ११ रोजी पार पडला असून आणखी सहा टप्प्यांचे मतदान होणार आहे. दरम्यान निवडणुकीच्या काळात सोशल मीडिया मोठी महत्त्वाची भूमिका बजावत असते. फेक न्यूज किंवा तेढ निर्माण करणाऱ्या मेसेजचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढलेले दिसते. फेक न्यूजला आळा घालण्यासाठी व्हॉट्स अॅपने काही फोन क्रमांकांना ब्लॉक केले आहे. त्याशिवाय काही युजर्सचे चॅट फीचर बंद केले आहे.
चार मुख्य कारणांमुळे व्हॉट्स अॅपने हे फोन क्रमांक ब्लॉक केले असल्याचे समोर आले आहे. व्हॉट्स अॅपने आपल्या ‘फ्रीक्वेंटली आस्कड क्वेश्नस’ (FAQ) मध्ये काही नियम स्पष्ट नमूद केले आहेत. कोणत्याही युजर्सने बल्क मेसेज, ऑटोमेटेड मेसेजचा प्रयत्न करता कामा नये. जर, एखाद्याला व्हॉट्स अॅप युजर्सला मेसेज पाठवला आणि त्याने तुमच्या मेसेजला रिपोर्ट केल्यास तुमचे अकाउंट बंद होऊ शकते. अनोळखी व्यक्तींचे व्हॉट्सअॅप नंबर ग्रुपमध्ये अॅड केल्यास तुम्हाला व्हॉट्स अॅप ब्लॉक करू शकतो. व्हॉट्स अॅप वापरणाऱ्यांच्या क्रमांकांची यादीची विक्री काही मार्केटिंग संस्थांकडून करण्यात येते. अशा फोन क्रमांकांची यादी बनवून एखाद्याच्या परवानगीशिवाय नंबर वापरल्यास व्हॉट्स अॅप तुम्हाला ब्लॉक करू शकतो.