नवी दिल्ली – पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार कोटींचा चुना लावून विदेशात पळालेल्या नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न चालू आहेत. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुंबईच्या पीएमएलए न्यायालयात पीएनबी घोटाळ्यातील मेहुल चोक्सीविरोधात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. आरोग्याचे कारण देत चोक्सीने चौकशीसाठी भारतात येण्यास वारंवार टाळाटाळ केली आहे. त्यामुळे त्याला अँटिग्वा येथून भारतात आणण्यासाठी आम्ही एअर अँब्युलन्स पाठवण्यासही तयार आहोत, यामध्ये वैद्यकीय तज्ज्ञ मंडळी असतील. त्याचबरोबर चोक्सीला भारतात सर्व प्रकारच्या आवश्यक वैद्यकीय सुविधा देखील पुरवण्यात येतील, असे ईडीने प्रतिज्ञापत्र म्हंटले आहे.
ईडीने प्रतिज्ञापत्र म्हंटले कि, कायदेशीर कारवाई होऊ नये यासाठी प्रकृती अस्वस्थेतेचा बहाणा बनवत आहे. मेहुल चोक्सीने तपासामध्ये कधीही सहकार्य केलेले नाही. ६१२९ कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आल्याचा चोक्सीने दावा केला आहे. मात्र, ही माहिती चुकीची असून चौकशीदरम्यान ईडीने केवळ २१०० कोटी रुपयांची संपत्तीच जप्त केली असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, चोक्सीविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले आहे. इंटरपोलने त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही काढली आहे. मात्र, तरीही त्याने परत येण्यास मनाई केली आहे. त्यामुळेच त्याला फरार घोषीत करण्यात आले आहे.