पेण- कोण म्हणतं? की आजची तरुण पिढी भरकटलेली आहे. ती केवळ अभ्यास, करियर वा 24 तास मोबाईल किंवा सोशल मीडियावर टाईमपास करीत असते. या गैरसमजुती ला खोट ठरवीत असताना पेण मधील युवा व युवती, ज्यांचे कॉलेज शिक्षण पूर्ण झालेले आहे किंवा चालू आहे. यातील काहीजण नोकरीसुद्धा करीत आहेत त्यांनी एकत्र येऊन गोरगरीब व आदिवासी जनतेमध्ये जाऊन त्यांना दिवाळीच्या मोठ्या उत्सवामध्ये सहभागी करून घेताना त्यांचा आनंद द्विगुणित केला. हाच भाव त्या लहान मुलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. कोवीडच्या महामारी च्या काळामध्ये या तरुणांनी रू.200-300 व इतर मित्रांकडून पैसे जमवुन नोटबूक, मास्क, सँनिटायझर, मोती साबण, उटणं,पार्ले जी, बिस्किट पुडा, चॉकलेट, वह्या, पुस्तक, पेन, दिवाळीचा फराळ अस सगळं मिळून रायगड मधील पेण तालुका जवळ असलेल्या आदिवासी पाड्यावर जाऊन वाटप केले.आदिवासी मुलांसोबत त्यांच्याशी खेळ खेळून, अभ्यासाच्या काही गोष्टी शिकवून, गाणी शिकून वेळ घालवला. यामध्ये ईला गोरे हिने पुढाकार घेऊन तिच्या सोबत मयुरी तांबे, मुस्कान झाटम, मानसी , गीता भानुषाली, श्रेयस, कैलास फेगडे, श्रेया , दिक्षिता कदम , आर्य फडके , आदित्य ईश्वरे, पूजा साळुंखे सामील होते कोण म्हणतं तरुण पिढीला जाणीव नाही या तरुणाने दाखवून दिलं की समाजातील इतर घटकांसोबत वेळ घालवणे किती आनंदाचे असते.
असाच उपक्रम गत तीन-चार वर्षापासून ईला व तिच्या मित्र-मैत्रिणी यांच्या सहकार्यातून राबविला जात आहे. अशा नावीन्यपूर्ण कार्यक्रमाचे समाजामध्ये सर्वत्र कौतुक केले जात आहे.