उमवित कॅबसीन प्रकल्पातंर्गत एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन
जळगाव ;- शिक्षकांनी केवळ माहिती आणि तंत्रज्ञानावर अवलंबून न राहता स्वतंत्र ज्ञान निर्मितीकडे वळण्याची गरज असून त्यासाठी क्षमता विकसित केंद्र (कॅबसीन) हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील शिक्षकांसाठी आणि विद्याथ्र्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ.केशव तूपे यांनी केले.
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात बुधवार, दि. 28 मार्च रोजी इरास्मस प्लस अनुदान प्राप्त कॅबसीन प्रकल्पातंर्गत एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ.तूपे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. मंचावर कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील, प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा.एस.टी.इंगळे व प्राचार्य एल.पी.देशमुख आणि या कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.ए.एम.महाजन उपस्थित होते.
डॉ.तूपे म्हणाले की, पाच युरोपियन देशातील आणि पाच भारतातील विद्यापीठांच्या एकत्रित इरास्मस प्लस अनुदानित कॅबसीन प्रकल्पातंर्गत शिक्षकांच्या क्षमता विकसनासाठी केले जाणारे प्रयत्न निश्चितच स्तुत्य असून त्याचे नेतृत्व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडे आहे ही आनंदाची बाब आहे. या विद्यापीठाची वाटचाल निश्चितच दखल घेण्यासारखी होत असून येत्या पाच वर्षात पहिल्या 200 विद्यापीठात उमविचे नाव राहिल. माहिती तंत्रज्ञानापेक्षा शिक्षकांची ज्ञान निर्मिती आणि विद्याथ्र्यांचा ज्ञान ग्रहणाचा काळ असायला हवा आणि त्यासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे.
प्रा.माहुलीकर यांनी या प्रकल्पाचा उमविला एक घटक होता आले हा बहुमान असल्याचे सांगून या प्रकल्पांतर्गत विद्यापीठातील काही शिक्षकांना आणि त्यानंतर त्यांच्याकरवी महाविद्यालयातील शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाईल आणि महाविद्यालयातील शिक्षक हे विद्याथ्र्यांना प्रशिक्षण देतील अशी माहिती त्यांनी दिली.
प्रारंभी समन्वयक प्रा.ए.एम.महाजन यांनी प्रास्ताविक केले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासह भारतातील पाच आणि युरोपियन देशातील (पोलंड, पोर्तुगाल, सायप्रस, स्लोवकिया, बेल्जीयम) अशा दहा संघटीत विद्यापीठांमधील इरास्मस प्लस अनुदानित कॅबसीन प्रकल्प राबविला जात असून याद्वारे व्हिडिओ लेक्चर, नोटस्, सादरीकरण विद्याथ्र्यांना आणि अभ्यासकांना प्राध्यापकांमार्फत उपलब्ध करुन दिले जाणार आहे. युरोपियन देशातील विद्यापीठांमध्ये प्रातिनिधीक स्वरुपात काही प्राध्यापकांना जाण्याची संधी उपलब्ध होणार असल्याचेही प्रा.महाजन यांनी सांंगितले. या उद्घाटन कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.भूषण चौधरी यांनी केले.
उद्घाटनानंतरच्या सत्रात डॉ.मनिष जोशी यांनी माहिती संप्रेषण तंत्रज्ञान आधारीत शिक्षण या विषयावर, डॉ.मधुलिका सोनवणे यांनी कौशल्य आधारीत शिक्षण, डॉ.भूषण चौधरी यांनी परस्पर संवादावर आधारीत शिक्षण आणि डॉ.अनिल डोंगरे यांनी अभ्यासक्रम रचना यावर उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. प्राचार्य आर.टी.चौधरी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. या कार्यशाळेसाठी तीनही जिल्हयातील शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.