पित्याला वाचविण्यासाठी मेहजबीनच्या दुआवर अल्लाही मेहरबान : कॅन्सरतज्ञांच्या प्रयत्नाला यश
जळगाव – घरातील परीस्थीती अत्यंत हालाखीची….अचानक जडलेला आजार…..अशात पाठीशी खंबीरपणे उभी राहीलेली मुलगी मेहजबीन….आणि कॅन्सर तज्ञांच्या प्रयत्नांना यश येण्यासाठी मेहजबीनच्या दुआवर मेहरबान झालेला अल्लाह…या सर्व गोष्टी जुळून आल्याने डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात अकोला येथील ६५ वर्षीय रूग्णाच्या स्वादुपिंडाच्या कॅन्सरवर फास्टट्रॅक व्हिपल्स शस्त्रक्रिया यशस्वी ठरली.
अकोला येथील बहरूल खाँ (वय ६५) यांचा शिलाई मशिन दुरूस्तीचा व्यवसाय आहे. घरोघरी सायकलवर फिरून शिलाई मशिन दुरूस्तीतुन मि णार्या पैशातुन पत्नी आणि एक मुलगी असा आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवितात. गेल्या तीन महिन्यापुर्वी बहरूल खाँ यांना जेवण जात नव्हते. त्यामुळे त्यांची मुलगी मेहजबीन हिने स्थानिक रूग्णालयात दाखविले. त्याठिकाणी आजाराचे निदान झाले नाही. त्यानंतर बहरूल खाँ यांना अकोला येथील मोठ्या रूग्णालयात नेऊन त्याठिकाणी सोनोग्राफी व सीटी स्कॅन तपासणी करण्यात आली. या तपासणीत स्वादुपिंड व पित्तनलिका या भागात कॅन्सरची गाठ असल्याचे निदान झाले. दुसर्या स्तराच्या कॅन्सरची ही गाठ काढण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागणार होती.
मात्र घरातील आर्थिक परीस्थीती ही अत्यंत हालाखीची राहील्याने कॅन्सर तज्ञ यांनी माणुसकी जोपासत त्यांना डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात उपचारासाठी भरती होण्यास सांगितले. मुलगी मेहजबीन हिने तात्काळ बहरूल खाँ यांना घेऊन डॉ. उल्हास पाटील रूग्णालय गाठले. याठिकाणी त्यांना भरती करून उपचाराला सुरवात झाली. कॅन्सरच्या गाठीमुळे पित्तनलिका ब्लॉक झाली होती. त्यामुळे काविळचे प्रमाण वाढत होते. अशात कॅन्सर तज्ञ डॉ. निलेश चांडक यांनी बहरूल खाँ यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. तसेच डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात उपलब्ध असलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेचीही माहिती त्यांनी मेहजबीनला दिली. मेहजबीन हीने डॉक्टरांनी सांगितल्यानुसार कागदपत्रांची पुर्तता केली. त्यानंतर बहरूल खाँ यांच्या स्वादुपिंडाच्या कॅन्सरवर फास्टट्रॅक व्हिपल्स ही आधुनिक पध्दतीची शस्त्रक्रिया अवघ्या साडेतीन तासात पुर्ण केली. दुसर्याच दिवशी बहरूल खाँ यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागल्याने ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरली. बहरूल खाँ यांना आता जेवणदेखिल करणे शक्य होत आहे. शस्त्रक्रिया कालावधीत मुलगी मेहजबीन हीने कुराणपठण करून कॅन्सर तज्ञांच्या प्रयत्नांना यश प्राप्त व्हावे म्हणुन दुआ केली. अल्लाहने देखिल निरागस मेहजबीनची ही दुआ कुबुल करीत मेहजबीनच्या पित्याला जणू जिवदानच दिले. कॅन्सरतज्ञ डॉ. निलेश चांडक यांना डॉ. नविन कासलीवाल, भुलरोग तज्ञ डॉ. सागर व्यास, डॉ. देवेंद्र चौधरी यांनी शस्त्रक्रियेसाठी सहकार्य केले. बहरूल खाँ यांची देखभाल डॉ. रिशभ पटेल व परीचारीका हे करीत आहे.
फास्टट्रॅक ही आधुनिक पध्दत – डॉ. निलेश चांडक
कॅन्सरच्या गाठीवर फास्टट्रॅक व्हिपल्स शस्त्रक्रिया ही आधुनिक पध्दतीची आहे. कॅन्सरच्या शस्त्रक्रियेला सहा तास लागतात. पण आधुनिक पध्दतीचा अवलंब आणि चांगल्या टिमवर्कमुळे ही शस्त्रक्रिया अवघ्या साडेतीन तासात करणे शक्य झाले. त्यामुळे बहरूल खाँ यांचे प्राण वाचविण्यात यश आल्याचे समाधान आहे असे कॅन्सर तज्ञ डॉ. निलेश चांडक यांनी सांगितले.
डॉक्टर माझ्यासाठीच देवच- मेहजबीन खाँ
माझ्यासाठी आई-वडील हेच सर्वस्व आहे. त्यांच्या आजाराची माहिती झाल्यानंतर मी पुर्णत: खचुन गेले होते. पण अल्लाहवर विश्वास ठेऊन वडीलांना डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात उपचारासाठी आणले. याठिकाणी कॅन्सर तज्ञ डॉ. निलेश चांडक आणि रूग्णालयातील सर्व स्टाफमुळे वडीलांना पुन्हा जिवदान मिळाले असुन येथील डॉक्टरच माझ्यासाठी देव असल्याचे मेहजबीन खाँ हिने सांगितले.