डाॅ. आव्हाड यांच्या विधानाशी आंबेडकरी सहमत- इंदिसे

0

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई  फुले यांच्या जयंतीनिमित्त ओबीसी एकीकरण समितीमध्ये ठाणे शहरात आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठीच्या आंदोलनात दलितांचे मोठे योगदान होते; आता ओबीसींनी आपले अस्तित्व टिकवण्यासाठी मैदानात उतरावे, असे भाष्य केले आहे. त्यांच्या या विधानाशी आम्ही आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते शंभर टक्के सहमत आहोत, असे प्रतिपादन रिपाइं एकतावादीचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांनी केले.

नानासाहेब इंदिसे यांनी याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहनिर्माण मंत्री ना. डॉ.  जितेंद्र आव्हाड यांना समर्थनाचे पत्रही दिले आहे. त्याबाबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे प्रतिपादन केले.

1988 ते 1990 या काळात मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी मोठा लढा उभारण्यात आला होता. त्यावेळी कालकथीत रा. सू. गवई यांच्या नेतृत्वाखाली देशभर आंदोलने उभारण्यात आली होती. या आंदोलनात मोठ्या संख्येने आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्ते सहभागी झाले होते. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या 340 व्या कलमात ओबीसी समाज घटकांसाठी आरक्षणाची तरतूद केली होती. ही बाब आता कुठे ओबीसींच्या ध्यानात येऊ लागल्याने ओबीसीही बाबासाहेबांच्या विचारधारेशी जोडले जाऊ लागले आहेत.

याबाबतची जनजागृती डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केल्यामुळेच काही मनुवाद्यांमध्ये पोटशूळ उठला असून ते आता डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आघाडी उघडत आहेत. मात्र, बाबासाहेबांच्या वाटेवर चालणार्‍या प्रत्येक समाजघटकाला आमचा पाठिंबा असणार आहे. ओबीसींच्या लढ्यात आंबेडकरी अनुयायी म्हणून आम्ही सोबत आहोत. डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या विधानाचे आम्ही समर्थन करीत असून त्यांनी मांडलेल्या या भूमिकेसाठी आम्ही त्यांना साह्यभूत भूमिका घेणार आहोत, असे इंदिसे यांनी म्हटले.

दरम्यान, महाविकास आघाडीचे सरकार हे शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्याा विचारधारेचा पुरस्कार करणारे आहे. आरक्षण टिकविण्यासाठी सरकारमधील डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्यासारखे मंत्री आपल्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहेत. ही बाब नक्कीच कौतुकास्पद आहे. त्यामुळे सध्या स्थगित करण्यात आलेले पदोन्नतीमधील आरक्षणही पूर्ववत करुन तमाम एससी., एसटी, ओबीसी, एनटी, व्हीजेएनटी जात समूहाला न्याय देण्याची कृपा करावी, अशी मागणीही नानासाहेब इंदिसे यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.