मुंबई : लडाखच्या गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसाचारामध्ये भारताने 20 सैनिक गमावले. त्यामुळे चीनमधील लोकांवर सध्या तीव्र संताप आहे. सोशल मीडियापासून ते राजकारणापर्यंत सगळेजण चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याविषयी बोलत आहेत. यातच महाराष्ट्र सरकारनंही चीनला मोठा धक्का दिला आहे.
मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० मध्ये स्वाक्षरी करण्यात आलेले चीनच्या कंपन्यांसोबतचे तीन करार ठाकरे सरकारने रोखले आहेत. या करारांनुसार चीनच्या कंपन्यांकडून महाराष्ट्रात ५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार होती. केंद्र सरकारसोबत चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. गलवान खोऱ्यातील हिंसक घटनेपूर्वीच या करारांवर स्वाक्षरी करण्यात आली होती. परराष्ट्र मंत्रालयाने यापुढे चीनच्या कंपन्यांसोबत कोणतेही करार करू नये, असा सल्ला दिला होता, अशी माहिती राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली.
अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी देण्यासाठी मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० ची संकल्पना होती. यामध्ये १२ करार करण्यात आले, ज्यात सिंगापूर, दक्षिण कोरिया आणि अमेरिकेतील भारतीय कंपन्यांचा समावेश आहे. इतर नऊ करारांवर राज्य सरकार सक्रियपणे अंमलबजावणी करत असल्याचं देसाई म्हणाले.

