ठाकरे सरकारचं आज खातेवाटप, गृह-अर्थ,महसूल मंत्रालयाची जबाबदारी कोणाकडे?

0
31

मुंबई : महाविकास आघाडीच्या सरकारमधील मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या सहा मंत्र्यांना आज खातेवाटप होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये अद्यापही कोणाला कोणतं मंत्रीपद द्यायचं यावरुन रस्सीखेच सुरु असल्याची माहिती आहे. मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे अर्थ मंत्रालय, तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रालयाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गृह मंत्रालयाची जबाबदारी कोणत्या नेत्याकडे सोपवायची, हे अद्याप निश्चित झालेलं नाही. आज मंत्रिमंडळाची दुपारी ३ वाजता बैठक पार पडणार असून या बैठकीत खातेवाटपावर चर्चा होऊ शकते.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे आरोग्य मंत्रालयाचा कार्यभार सुपूर्द केला जाण्याची शक्यता आहे. तर सुभाष देसाई यांच्याकडे पुन्हा उद्योग मंत्रालयाचीच धुरा दिली जाऊ शकते. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याकडे पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस नेते डॉ. नितीन राऊत यांच्याकडे सामाजिक न्याय विभागाचा पदभार सोपवला जाण्याचे संकेत मिळत आहेत. काँग्रेस नेते दिल्लीत गेले असून खातेवाटपासंबंधित चर्चा करण्यात आल्याचं कळत आहे.

१६ ते २१ डिसेंबर दरम्यान नागपुरात हिवाळी अधिवेशन पार पडणार असून त्याआधी मंत्रिमंडळ विस्तार होणं अशक्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारदेखील हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात इच्छुक नसल्याची माहिती आहे. खातेवाटपासंबंधी अद्यापही शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये चर्चा झालेली नाही. त्यामुळे ही चर्चा होऊन त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी वेळ लागू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here