ठाकरे सरकला धक्का ; मेट्रो कारशेडचे काम तात्काळ थांबवण्याचे हायकोर्टाचे आदेश

0

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या मुंबईमेट्रोच्या कांजूरमार्गमधील कारशेडच्या मुद्द्यावर राज्य सरकारला मुंबई हायकोर्टाचा मोठा धक्का बसला आहे. कारण मुंबई मेट्रो-३ चे कारशेड कांजूरमार्गमध्ये उभारण्यासाठी १०२ एकर जमीन एमएमआरडीएला हस्तांतर करण्यासाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी १ ऑक्टोबर रोजी काढलेल्या आदेशाला मुंबई हायकोर्टाची स्थगिती दिली आहे.

 

कांजूरमधील जागेवर मालकी हक्क सांगत केंद्र सरकारने जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तांतरणाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. त्यावर आज सुनावणी पार पडली. फेब्रुवारीत याप्रकऱणी अंतिम सुनावणी सुरु होणार आहे.

 

सुनावणीदरम्यान सरकारने निर्णय मागे घेण्याची आणि संबंधित पक्षकारांना नव्याने सुनावणी देण्याची तयारी दाखवली. पण कारशेडचे काम सुरू ठेवू देण्याची विनंती केली. केंद सरकार आणि हस्तक्षेप याचिका करणाऱ्याने विरोध दर्शवल्यानंतर सरकारने जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश मागे घेण्यास नकार दिला. त्यानंतर न्यायालयाने केंद्र सरकारची याचिका अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेत जागा हस्तांतरणाच्या निर्णयाला स्थगिती देत कारशेडच्या कामालाही मज्जाव केला.

 

 

आरे वसाहतीत कारशेड उभारण्यास पर्यावरणप्रेमींनी केलेल्या विरोधानंतर महाविकास आघाडी सरकारने मेट्रो कारशेडसाठी कांजूर येथील जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या जागेवर मालकी हक्क सांगत केंद्र सरकारने जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तांतरणाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.

 

 

मुंबई मेट्रो-३ प्रकल्पासाठी कांजूरमार्ग येथील १०२ एकर जागा एमएमआरडीएला हस्तांतरित करण्याच्या मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाबाबत उच्च न्यायालयाने सोमवारी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसंच जिल्हाधिकारी आपला आदेश मागे घेऊन सगळ्या पक्षकारांची नव्याने सुनावणी घेणार का, की जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कायदेशीर प्रक्रियेला अनुसरून नसल्याचा निष्कर्ष देऊन तो आम्ही रद्द करू? अशी विचारणा न्यायालयाने सरकारला केली होती. त्याबाबत बुधवारी भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले होते. प्रकल्पाला सुरुवात करण्यापूर्वी असे वाद संपुष्टात आणायला हवेत, असंही न्यायालयाने यावेळी सरकारला सुनावलं होतं.

Leave A Reply

Your email address will not be published.