ट्रकने धडक दिल्यानंतर व्हॅनला आग ; ७ जणांचा होरपळून मृत्यू

0

उन्नाव : आग्रा-लखनऊ एक्सप्रेस वेवर ट्रक आणि व्हॅन यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातानंतर लागलेल्या आगीत ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला. गाडीतून एकूण ७ जण प्रवास करीत होते. या गाडीतील कुणालाही वाचवण्यात यश आलं नाही.  गाडीत अडकलेले लोक जिवाच्या आकांतानं ओरडत, किंचाळत होते. परंतु, त्यांना गाडीचा दरवाजा उघडण्यात यश आलं नाही. आग एवढ्या वेगानं पसरली की कुणाला काही करण्याची संधीच मिळाली नाही, असं प्रत्यक्षदर्शीचं म्हणणं आहे.

रविवारी रात्री आग्रा – लखनऊ एक्सप्रेस वेवर उन्नाव टोल प्लाझाजवळ हा अपघात घडला. हा अपघात इतका भयंकर होता की ट्रकचा पुढचा भाग गाडीमध्ये घुसला होता. गाडीचा चालकही गाडीबाहेर पडण्यात आणि स्वत:ला वाचवण्यात अपयशी ठरला आणि पाहता पाहता या आगीत सात जण जिवंत जळाले.

मिळालेल्या माहितीनुसार, गाडीतून प्रवास करणारे सातही जण शाहजहांपूरमध्ये एका लग्नात सहभागी होण्यासाठी निघाले होते. पोलिसांनी गाडी क्रमांकाची चौकशी केल्यानंतर ही गाडी अंकित वाजपेयी यांची असल्याचं समोर आलं. त्यांच्यासोबत असलेले त्यांचे चार प्रवासी सफीरपूरचे रहिवासी होते. त्यांच्याबद्दल अधिक माहिती मिळवण्याचं आणि मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.