एरंडोल (प्रतिनिधी) पलासखेडे (ता.पारोळा ) येथील वृध्द माधव महारु पाटील (वय ६५) हे कासोदा येथे महिला नातेवाईकाच्या अंत यात्रेसाठी दुचाकीने जात असतांना राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर पातरखेडे गावाजवळ एरंडोलकडुन भरधाव वेगाने येणाऱ्या मालट्रकने दुचाकीला धडक दिली. त्यात महादु पाटील हे ठार झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान ट्रक चालक फरार झाला असुन ट्रक एरंडोल पोलिस स्टेशनला जमा करण्यात आला आहे. अंत यात्रेला जाणाऱ्या इसमाचा वाटेवर दुर्दैवी अंत झाला. याबाबत पलासखेडे गावामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
एरंडोल पोलीस स्टेशन सुत्रांनी दिलेली माहिती अशी की महादु महारु पाटील (महाडिक) हे एम.एच.१९ -ए.टी.०६९४ क्रमांकाच्या स्प्लेन्डर या दुचाकीने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरून एरंडोल कडे जात होते.पातरखेडे फाट्याजवळ ओ. आर.१५ आर.०७९५ क्रमांकाचा मालट्रक भरधाव वेगाने ओव्हर टेक करत येऊन दुचाकीला समोरून ठोस मारली.त्यात महादु पाटील हे रस्त्यावर खाली पडले. ते गंभीर जखमी झाले. त्यांना एरंडोल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता वैदयकीय अधिकारी डॉ.राहुल पाटील यांनी ते मृत झाल्याचे घोषित केले.दरम्यान ट्रक चालक ट्रक सोडून फरार झाला.
जवळपास १५ दिवसांपासून एरंडोल ग्रामीण रुग्णालयाची १०८ सुविधा बंद पडल्यामुळे शुक्रवारी मृताच्या नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयात संताप व्यक्त केला.१०८ सुविधा मिळाली असती तर माझे काका वाचले असते असे संताप जनक उद्गार पळासखेडे येथील अविनाश पुंडलिक पाटील यांनी व्यक्त केला.
याप्रकरणी एरंडोल पो.स्टे. ला भाग 5 गु.र.नं.75/19 भा.द.वि.कलम 279,304 (अ),मोटर व्हेईकल ऍक्ट 184 प्रमाणे दाखल आहे.सहाय्यक फौजदार प्रदीप चांदोलकर व अरुण मोरे हे तपास करीत आहे.महा दु पाटील यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.