झारखंडचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांचा पक्ष अखेर भाजपमध्ये विलीन

0

रांची : झारखंडचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांचा पक्ष (जेव्हीएम-पी) अखेर भाजपमध्ये विलीन झाला. नुकत्याच झालेल्या झारखंड विधानसभा निवडणुकीत त्या दोन्ही पक्षांना हादरा बसला. त्या निकालातून धडा घेत त्या पक्षांनी विलिनीकरणाची प्रक्रिया मार्गी लावली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत सोमवारी येथे झालेल्या सभेत मरांडी यांचा पक्ष अपेक्षेप्रमाणे भाजपमध्ये विलीन झाला. मरांडी यांनी पुन्हा कमळ हाती घेतल्याने झारखंडमध्ये भाजप मजबूत होण्यास हातभार लागेल, असा विश्‍वास शहा यांनी व्यक्त केला. मी भाजपच्या अध्यक्षपदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर 2014 पासूनच मरांडी यांना स्वगृही आणण्यासाठी प्रयत्नशील होतो, असा गौप्यस्फोटही शहा यांनी केला.

झारखंडचे पहिले मुख्यमंत्री बनवण्याचा मान मरांडी यांनी मिळवला. भाजपमध्ये असताना त्यांनी नोव्हेंबर 2000 ते मार्च 2003 या कालावधीत ते पद भुषवले. त्यानंतर मतभेदांमुळे त्यांनी भाजपशी फारकत घेऊन 2006 मध्ये झारखंड विकास मोर्चा-प्रजातांत्रिक (जेव्हीएम-पी) या पक्षाची स्थापना केली. झारखंडमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे भाजपला त्या राज्याची सत्ता गमवावी लागली. तर मरांडी यांच्यासह जेव्हीएम-पीचे केवळ 3 आमदार निवडून आले. त्यातील 2 आमदारांची कॉंग्रेसशी जवळीक साधल्याने मरांडी यांनी काही दिवसांपूर्वी पक्षातून हकालपट्टी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.